पाचशेच्या 370 बनावट नोटा जप्त

1 लाख 85 हजार किमंतीच्या नोटा वटविणार्‍यास अटक

नवी मुंबई ः सीबीडी बेलापुर येथे भारतीय चलनातील बनावट नोटा खर्‍या म्हणुन वटवण्याकरिता एक इसम येणार असल्याची गोपनाय माहिती मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्याकडून 500 रुपयांच्या 1 लाख 85 हजार रु. किमतीच्या 370 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव सलीम अली असरील हक (30)असून तो सध्या रा. तळोजा, मुळ पश्‍चिम बंगाल येथील राहणारा आहे. याने पश्‍चिम बंगाल येथून त्याचे साथीदाराकडून 500 रुपये दराच्या भारतीय चलनातील बनावट नोटा आणुन त्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे वटविणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जी.डी.देवडे यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे अधिकारी, अमंलदार यांनी सापळा लावुन आरोपीस सीबीडी बेलापुर येथे अटक केली. आरोपीच्या ताब्यातील 500 रुपये दराच्या 300 भारतीय चलनातील बनावट नोटा व आरोपीच्या घरातील 170 भारतीय चलनातील बनावट नोटा अशा एकुण 1 लाख 85 हजार रुपये किंमतीच्या भारतीय चलनातील 370 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीने बनावट नोटा कोठुन व कशा मिळवल्या किंवा बनवल्या याबाबत अधिक तपास सुरु आहे. 

 पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी. शेखर पाटील(गुन्हे), पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटील(गुन्हे शाखा), सहा. पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवती कक्षाचे वपोनि एन.बी.कोल्हटकर, सपोनि गंगाधर देवडे, ज्ञानेश्‍वर भेदोडकर, पोलीस अमंलदार नितीन जगताप, विष्णु पवार, मेघनाथ पाटीलस, सचिन टिके, अजय कदम, किरण राऊत, मिथून भोसले, सतिश चव्हाण, रुपेश कोळी, यांनी सदरची कामगिरी केली. पुढील तपास सपोनि गंगाधर देवडे, करत आहेत.