मनस्थिती बदलली तरच परिस्थिती बदलेल

जागतिक महिला दिन  म्हणजेच स्त्रीत्वाचा उत्सव. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणार्‍या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणार्‍या सर्जनत्वाचाही प्रत्येय तिला रोजच येत असतो. आज सर्वच क्षेत्रात स्त्रीयांनी आपल्या कर्तत्वाची छाप उमटवली आहे. घरापासून ते देशपातळीपर्यंत अनेक सुत्रे ती सांभाळत आहे. एकाचवेळी अनेक भुमिका चोख पार पाडणार्‍या या रणरागिंनीने यशाचे कितीही उंच शिखर गाठले तरी आज तिची सुरक्षा मात्र रामभरोसेच असल्याचे दिसते. सर्वात पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरवात 28 फेब्रुवारी 1909 रोजी कामगार चळवळीपासून करण्यात आली. महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघात एक थीम तयार करण्यात आली होती. जागतिक महिला दिनाची पहिली थीम ‘सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर’ ठेवली होती. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते. या वर्षासाठीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे थीम म्हणजे ‘महिला नेतृत्त्व: कोविड-19 च्या जगात समान भविष्य’ ही थीम कोव्हिड-19 साथीच्या काळात आरोग्यसेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते. 

8 मार्च म्हटंल की नारीशक्तीच्या सन्मानाच्या घोषणा सुरु होतात. महिलांच्या प्रगतीचा दिवस म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करुन स्त्रियांचा सन्मान केला जातो. महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होवू लागला. 19 व्या शतकात मतदानाचा अधिकार मिळाला, सावित्रीमाईंमुळे शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि मुलगी शिकली प्रगती झाली, नंतर तिला आरक्षण मिळाले, आज स्त्रिला पुरषांबरोबरीचा सन्मानही मिळू लागला आहे, पण एवढे सगळे होऊनही तिचे रक्षण झाले आहे का हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. एकीकडे तिला सन्मान दिला जातो तर दुसरीकडे नराधम लांडग्यांकडून तिच्या शरिराचे लचके भरदिवसा तोडले जात आहेत. आज दोन वर्षांच्या चिमुरडीपासून 90 वर्षांची आजीबाईदेखील सुरक्षित नाही. जेथे फुलाच्या पाकळ्या फुलण्याआधीच गळून पडत असतील, खेळण्या बागडण्याच्या वयात कोवळी बाहुली लैंगिक अत्याचाराची शिकार होत असेल त्या समाजात केवळ महिला दिन साजरा करुन स्त्रीचे रक्षण कसे होणार. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने मोलाची कामगिरी केली आहे. अनेक क्षेत्रातील पुरुषांची मत्तेदारी स्त्रियांनी मोडीत काढली असली तरी तिला अनेक संकटांचा आणि रोषाचा सामना करावा लागत आहे हे तितकेच खरे आहे. रिक्षा, ट्रेन, विमान, बस सर्व ठिकाणी महिला काम करत आहेत. परंतु काही पुरुष आजही त्यांना हे पुरुषी काम असून स्त्रिया करु शकत नाही म्हणून महिलांचे खच्चीकरण करतानाचे चित्र पाहायला मिळते. तिच्या जिद्दीला दाद देण्याऐवजी पुरुषी अहंकार मिरवणार्‍या वृत्तीला वेळीच लगाम घालणे गरजेचे आहे. तिच्या कतृत्वावर शंका-कुशंका घेण्यापेक्षा तिला आकाश कवेत घेण्याचे बळ दिले, वास्तवात सन्मानाची वागणूक दिली तर खर्‍या अर्थाने स्त्री-पुरुष समानता येईल. मनस्थिती बदलली तरच परिस्थिती बदलेल. 

जो समाज स्वत:ला सुसंस्कृत म्हणवतो तोच समाज स्त्रिला उपभोग्य वस्तू मानून तिला माणूस म्हणूनही जगू देत नाही. क्षणिक सुखासाठी एखाद्या अबलेचा बळी घेतला जातो. ज्या अत्याचाराच्या घटना आपण टिव्ही वर पाहतो, ऐकतो किंवा ज्या डोळ्यासमोर दिसतात त्यांचाच आकडा मोठा आहे. पण आजही दुरदुर असलेल्या खेडोपोडी, ग्रामीण भागात अशा कितीतरी महिला आहेत ज्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचाच फुटलेली नाही. त्याची दखल कोण घेणार? समाजातील कतृत्वान महिलांना अधिक बळ देण्यासाठी महिला दिन साजरा होतो ते ठिक आहे पण ज्यांचा आवाज दबला गेला आहे अशा महिलांना बळ देण्यासाठी आणि मुळात अशा घटनांना आळा कसा बसेल याचा गांर्भियाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

महिलांनी स्वतःला शारिरिकदृष्ट्या सक्षम ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार स्वतःला अपडेट ठेवा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. नेहमी आनंदी राहा, जेणेकरुन संपुर्ण कुटुंब आनंदी राहू शकेल. मुलांमुलींमध्ये भेदभाव न ठेवता समानता कशी राहील हे पाहणे गरजेचे आहे. मुलांप्रमाणेच मुलींनाही कराटे किंवा स्वःरक्षणाचे धडे द्या. मुलींना कायद्याचे शिक्षण असणेही गरजेचे आहे. ज्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळू शकेल. महिला सुरक्षेसाठी विविध अ‍ॅप आहेत त्याविषयी योग्य ते ज्ञान करुन घ्या ज्यामुळे नेहमी अलर्ट राहता येईल.
- संगिता शिंदे-अल्फान्सो,  सहायक पोलीस आयुक्त

 

जीवन हे सर्वस्वी एका महिलेचे देणं आहे. मला वाटते की सर्व स्त्रियांनी एक चिंतामुक्त जीवन जगावे आणि त्यासाठी तुम्ही आणि तुम्हीच सक्षम आहात. मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता व्यवसायाकडे वळा मग ते कोणतेही क्षेत्र असो. मनापासून प्रामाणिक प्रयत्न करा यश तुमचेच आहे. 
- नेहा नार्वेकर, उद्योजिका 


अजूनही पुरुषी मानसिकता फारशी बदललेली जाणवत नाही. कारण जेथे पुरुषांची मत्तेदारी होती त्या क्षेत्रात आज स्त्रियाही बिनधास्त काम करत आहेत हे काही पुरुषांना रुचत नाही. बस वाहक म्हणून काम करताना मला फार आनंद होत आहे. पण बर्‍याचदा या क्षेत्रातील आणि इतर काही पुरुषमंडळींनी हे स्त्रियांचे काम नाही म्हणून हिणवले आहे. महिलांनी मात्र फार सपोर्ट केला आहे. विशेष म्हणजे रात्रीचा प्रवास करणार्‍या महिलांना बसवाहन महिला असेल तर त्या जास्त सुरक्षित फिल करतात. 
- स्वाती कदम, बस वाहक

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची मध्यवर्ती कल्पना उहेेीश ींहश उहरश्रश्रशपसशी अशी आहे. कोरोनाच्याकाळात महिलांनी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पातळीवर प्रचंड कोंडमारा सहन केला. त्यांची प्रचंड उलाघाल झाली, कौंटुंबिक हिंसाचार झाला पण उपजतच असलेल्या चिवट स्वभाव धर्मामुळे त्यांनी आव्हानांना पेलले आहे व यापुढेही त्या पेलतील अशी मला खात्री आहे. महिला दिनाच्या सर्व कष्टकरी, शेतकरी, कामगार, करावेचक व समतेचा विचार पुढे नेणेार्‍या समस्य भगिनींना शुभेच्छा.
- वृषाली मगदुम, साहित्यिक

महिलांना सर्वच क्षेत्रात तारेवरची कसरत करावी लागते. गृहिणी असली तरी सगळी नातीगोती सांभाळून घर कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवण्याची मोठी जबाबदारी तिला पार पाडावी लागते. वर्किंग वुमन असेल तर तिला हे सगळे सांभाळूनच नोकरीवर लक्ष द्यावे लागते. अशी ही सर्वगुणसंपन्न नारी एकाचवेळी अनेक भुमिका बजावते. तिने नेहमी खंबीर राहिले पाहिजे. हल्ली इंटरनेटवर एका क्लिकवर हवे असलेले ज्ञान मिळते. गृहीणींनी फावल्या वेळात ते शिकले पाहिजे. स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. 
- नयना बागुल, गृहिणी


महिला सक्षम असणे काळाची गरज आहे. जर महिला सक्षम झाल्या तर त्या स्वतःच घर उभं करु शकतात. मुलांना शिकवू शकतात. समाजातील इतर महिलांना त्या शिक्षण देऊन मदत करु शकतात. घरातूनच मुलांना स्त्री पुरुष समानता शिकवणे गरजेचे आहे. तेव्हाच महिलांचा खरा सन्मान, आदर राखला जाईल. या महिलादिनी महिलांनी सक्षम व्हा एवढच सांगेन.
- आरती मुळीक परब, पत्रकार