गणेशोत्सवाची उंची मूर्तीच्या नव्हे, तर विचारांच्या उंचीत असावी!
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2026
- 24
सध्या महाराष्ट्रात गणेशमूर्तीच्या उंचीबाबत सुरू असलेली चढाओढ चिंतेचा विषय ठरत आहे. भक्ती आणि उत्साहाच्या नावाखाली मूर्तीची उंची वाढविण्याची स्पर्धा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. अलीकडील भुलेश्वर मंडळाच्या गणपतीची घटना हे त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना उत्साहाबरोबरच सुरक्षितता, पर्यावरणसंवर्धन आणि सामाजिक भान यांचाही विचार होणे गरजेचे आहे.
याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील विजयपूर येथील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे. हे मंडळ गेल्या आठ वर्षांपासून गणेशमूर्तीचे विसर्जन करत नाही. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याच मोठ्या मूर्तीची भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते. विसर्जनासाठी मात्र छोटी गणेशमूर्ती वापरली जाते. मोठ्या मूर्तीसाठी मंडळाने छोटेखानी मंदिरही उभारले आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिराजवळून शाळेत जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज शाळेत जाण्यापूर्वी गणरायाचे दर्शन घेतात, पूजा-अर्चा, आरती आणि प्रार्थना करतात. त्यामुळे त्यांच्या मनावर श्रद्धेबरोबरच पर्यावरणप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि चांगल्या संस्कारांचीही रुजवण होते.
खरे पाहता, गणेशोत्सवाची खरी उंची गणपतीच्या मूर्तीच्या आकारात नसून आपल्या विचारांच्या उंचीत असते. उत्सव साजरा करताना निसर्गाची हानी न करता, पुढच्या पिढीला चांगला संदेश देत आणि समाजहित जपत उत्सव साजरा करणे हीच खरी गणेशभक्ती आहे. एका छोट्याशा शहरातील एका सार्वजनिक मंडळाने गेली आठ वर्षे पर्यावरणाची काळजी घेत, परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत जो आदर्श निर्माण केला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. गणरायाला मोठी मूर्ती नव्हे, तर मोठा विचार प्रिय असतो. म्हणूनच यंदाच्या गणेशोत्सवात स्पर्धा असावी ती मूर्तीच्या उंचीची नव्हे, तर आपल्या विचारांच्या उंचीची!
अमरजा चव्हाण
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai