बँक कर्मचार्‍यांचा दोन दिवस देशव्यापी संप

नवी दिल्ली : सरकारी बँक खासगीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक बँकांमधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या नऊ संघटनांनी दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचार्‍यांचा हा संप आज सकाळी 6 पासून उद्या रात्री 12 पर्यंत असणार आहे. आयडीबीआयसह इतर दोन बँकेच्या खाजगिकरणाबाबत जी घोषणा सरकारने केली, त्याला या संघटनानी विरोध केला आहे.

या संपात जवळपास 10 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. ज्यामुळे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयसह प्रमुख सरकारी बँकांच्या सेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपामुळे बँकाच्या अनेक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शुक्रवार वगळता पाच दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. बँकेचा संप असला तरी तुम्हाला तातडीचे आर्थिक व्यवहार डिजीटल माध्यमातून करता येऊ शकतात. देशभरातील जवळपास दहा लाख तर महाराष्ट्रातील सुमारे पन्नास हजार कर्मचारी आजच्या या संपात सहभागी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.