पालिकेने लस खरेदी करुन नवी मुंबईकरांना मोफत द्यावी

आ. गणेश नाईक यांची मागणी ; कोविडचा मृत्यूदर कमी करावा

नवी मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव सुरू होताच जुलै 2020 मध्ये सर्वात आधी नवी मुंबई महापालिकेने कोरोनाची लस खरेदी करून ती सर्व नवी मुंबईकरांना मोफत द्यावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली होती. पालिकेने आता चार लाख लसींची खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. त्यावर आपली प्रतिक्रीया देताना नाईक यांनी नवी मुंबईच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लस खरेदी करून ती सर्व नवी मुंबईकरांना विनामुल्य द्यावी, या मागणीचा पुनरूच्चार केला आहे. तसेच कोविडचा मृत्यूदर कमी कसा होईल याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.

नवी मुंबईत अडीच लाख नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 56 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 15 लाखांच्या एकुण लोकसंख्येत 10 लाख नागरिक लस घेण्यास पात्र आहेत. सुरूवातीला पालिका चार लाख लसी खरेदी करणार आहे. त्यावर नाईक म्हणाले, लसींसाठी राज्य किंवा केंद्र सरकारवर अवलंबून न रहाता उर्वरित सर्व नागरिकांसाठी पालिकेनेच लस खरेदी करावी. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार संदीप नाईक म्हणाले, पालिकेच्या माध्यमातून जर लस उपलब्ध झाली नाही तर नाईलाजाने खाजगी केंद्रांतून पैसे मोजून नागरिकांना लस घ्यावी लागणार आहे. मागाहून पालिकेने लस उपलब्ध करून दिल्यास त्याचा उपयोग नाही. लस खरेदीच्या ग्लोबल टेंडरमध्ये वाढीव लस खरेदी करण्याची तरतूद असून आवश्यकता भासल्यास जादा लस खरेदी करता येईल, अशी ग्वाही आयुक्त बांगर यांनी दिली. 1400 ते 1500च्या घरात गेलेली कोरोनाची नवी मुंबईतील आकडेवाढ आज 150 ते 200च्या घरात नियंत्रणात आले आहेत. मात्र मृत्यूची संख्या अद्यापही चिंताजनक आहे. 1 मे 2021 ते 13 मे 2021 या कालावधीत 114 कोरोनाबाधित दगावले आहेत. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधत नाईक यांनी मृत्यूदर कमी करण्याची सुचना केली. सिडको एक्झिबिशन सेंटर मधील कोरूना केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे मत संदीप नाईक यांनी मांडले. या ठिकाणी पायाभूत सुविधा असूनही रूग्णांची आवश्यक काळजी घेण्यात येत नाही. नागरिक व्हिडिओ कॉन्फिरन्स करून ही माहिती देतात, असा  मुददा त्यांनी मांडला व डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा सल्ला दिला. संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभुमीवर बालरोगतज्ञांचा टाक्स फोर्स तयार करणे, खास मुलांसाठी उपचार कक्ष, अतिदक्षात कक्ष सुरू करणे, वैद्यकीय उपकरणे आणि औषधांचा आवश्यक साठा तयार ठेवणे, कोविड बाधित मुलांसोबत त्यांच्या पालकांना ठेवण्यासाठी एसओपी तयार करणे अशा विविध सुचना केल्या.

कोविड पश्‍चात मधुमेहींना तसेच ज्या रूग्णांना स्टिरॉईडस देण्यात आली आहेत अशांचा म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराची बाधा होते आहे. नवी मुंबईतही या आजाराचे रूग्ण आढळत आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी या आजारावर मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी नाईक यांनी केली असता आयुक्तांनी ती मान्य केली. वाशी, नेरूळ आणि ऐरोली येथे पालिकेने या आजारासाठी बाहय रूग्ण विभाग स्थापन केला असून निदान चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.

कामचुकार अधिकार्‍यांमुळे पाणी तुंबले

तौत्के वादळात झालेल्या मुसळधार पावसात बेलापूर आणि वाशी येथे पाणी तुंबले. खाडींच्या झडपा वेळेत बंद न केल्याने तसेच होल्डिंग पॉन्डची सफाई झाली नसल्याने ही परिस्थिती उदभवल्याचे नाईक म्हणाले. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पाणी उपसा करणारे पंप सुरू झाले नसल्याचे कारण अधिकार्‍यांनी दिले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत नाईक यांनी असा प्रकार भविष्यात होणार नाही यासाठी अशा अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना समज देण्याची मागणी केली. पंपांना 24 जास विद्युतचा बॅकअप देण्यात येवून हलगर्जीपणा करणार्‍यांना समज देण्याचे आयुक्तांनी मान्य केले.