नवी मुंबईतील पत्रकारांना पालिकेचा ‘डोस’

नवी मुंबई ः चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पत्रकारांचे लवकरात लवकर कोव्हीड लसीकरण व्हावे अशी मागणी राज्यातील विविध राजकीय पक्ष तसेच प्रसारमाध्यमाद्वारे केली जात आहे. नवी मुंबईतील पत्रकारांनाही कोरोना लसीकरणाचा लवकर लाभ मिळावा यासाठी नगरविकास मंत्री तसेच ठाण्याचेे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालिका आयुक्तांनी बेलापुर येथील अपोलो रुग्णालयात शनिवारी पत्रकारांना लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.  

कोव्हिड विरोधी लढ्यामध्ये विविध घटकांप्रमाणे विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांंनी जनतेपर्यंत योग्य  माहिती पोहचविण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्याअनुषंगाने पत्रकारांचेही लसीकरण व्हावे याकरिता पत्रकारांसह विविध राजकीय पक्षही आग्रही होते. या मागणीची दखल घेऊन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना केलेल्या सूचनांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार पालिकेच्यावतीने नवी मुंबई महापालिका पत्रकार कक्षाशी संबंधित पत्रकारांना 29 मे रोजी बेलापुर येथील अपोलो रुग्णालयात दुपारी 12.30 ते 5 यावेळेत लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या लसीकरणासाठी आदित्य बिर्ला फाऊंडेशन यांनी सहकार्य केले आहे. या कोव्हिड लसीकरण केंद्राला शनिवारी खासदार राजन विचारे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे व इतर शिवसेना पदाधिकार्‍यांनी भेट दिली.