महागाई व इंधन दरवाढीचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नवी मुंबईत आंदोलन

नवी मुंबई ः कोरोनाचे संकट त्यात वाढती महागाई आणि इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य जनता पार कोलमडून गेली आहे. वाढत चाललेली महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नवी मुंबईत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घरगुती गॅस, शेगडी तसेच दुचाकी आडवी करून इंधन दरवाढी विरोधात निषेध करण्यात आला. 

दररोज वाढत जाणारेे पेट्रोल व डिझेलचे दर आणि घरगुती गॅस दर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आधीच कोरोनामुळे जगात आर्थिक मंदी परसली आहे. यामुळे सर्वांचेच बजेट कोलमडले आहे. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. इंधनाचे दर वाढत आहे. गॅसच्या किमंतीत वाढ होत आहे. यामुळे सामान्यांची आर्थिक परिस्थिती खालवत चालली आहे. या महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईच्यावतीने आंदोलन करण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी निषेध करण्यात आला. कोरोनामुळे जनतेची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना देखील केंद्र सरकार भाव वाढ करत असल्याने या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असल्याची टीका यावेळी करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घरगुती गॅस, शेगडी तसेच दुचाकी आडवी करून इंधन दरवाढी विररोधात निषेध करण्यात आले. यावेळी प्रशांत पाटिल, नामदेव भगत, जी एस पाटील, मल्लिकार्जुन पुजारी तसेच मोठ्या संख्येनें पदाधिकारी उपस्थित होते. नेरूळ पश्‍चिम तालुकाध्यक्ष महादेव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेरुळ येथेही केंद्र सरकारचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

सध्या देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट सुरू आहे. या परिस्थितीत नागरीकांच्या नोकर्‍या, व्यवसाय बुडाले आहेत. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकार इंधन दरवाढ करत आहे. त्यामुळे मोदी सरकार हे मेलेल्यांच्या मढ्यावरील लोणी खाण्याचे काम करत आहे अशी उपमा दिली तर वावगे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी वाशीत दिली.