Breaking News
मुंबई : सतत पडणार्या मुसळधार पावसाने रायगड, कोकणातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच नौदलाची सात पथके दाखल झाली.
नौदलाच्या नौसैनिकांची सुसज्ज पथके व निष्णात डायव्हर कोकण आणि रायगड परिसरात पोहोचले असून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी मोठी हेलिकॉप्टरही रवाना झाली आहेत. गरज भासल्यास राज्यात अन्यत्र पूरग्रस्त ठिकाणी जाण्यासाठीही नौदलाची पथके तयार ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, नौदलाच्या पश्चिम विभागाने बचाव पथके तसेच हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात तैनात करण्याचा निर्णय घेतला. काल रात्री मुंबईहून निघालेली ही पथके आज सकाळी महाडपर्यंत गेली आहेत. पूर व पावसाच्या परिस्थितीनुसार तेथून ते पुढे जाणार आहेत.
खराब हवामानाची पर्वा न करता नौदलाची सात पथके रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी गुरुवारी रात्री मुंबईहून ट्रकमधून निघाली. तर मुंबईतील नौदलाच्या आएनएस शिक्रा या हवाई तळावरून सीकिंग हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यात जाऊन तेथील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेईल. या पथकांकडे रबरी बोटी, प्रथमोपचार संच, लाईफ जॅकेट व अन्य जीवरक्षक साधने आहेत. ातील निष्णात डायव्हर्सकडे खोल पाण्यात बुडी मारण्यासाठी लागणारी उपकरणेही आहेत. तर गरज भासल्यास राज्यातील अन्य पूरग्रस्त भागात जाण्यासाठीही नौसैनिकांची पथके सज्ज आहेत, अशी माहिती नौदल प्रवक्त्याने दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai