पनवेल पालिकेच्या कर संकलनात कोटींचा टप्पा पार

सवलतीसाठी 31 जुलैलाही सुरु राहणार प्रभाग कार्यालये

पनवेल ः महापालिकेने लागू केलेल्या नव्या कर प्रणालीला विरोध होत असला तरी करसंकलनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही नागरिक कर भरण्यास चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत एकूण 23 कोटी 26 लाख 70 हजारांचा करभरणा झाला आहे. सवलतींचा लाभ मिळवण्याची शेवची दि. 31 जुलै आहे. त्यामुळे त्या दिवशीची शासकीय सुट्टी रद्द करुन प्रभाग कार्यालय व मुख्यालयातील मालमत्ता विभागाचे कार्यालय सुरु असणार आहे. 

पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना करभरण्यासाठी आयुक्तांनी आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यात मालमत्ता कर संकलनाने कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पनवेल कार्याक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मालमत्ता करभरणा करणे आवश्यक आहे. 31 जुलै पर्यंत ऑनलाईन करभरणा केल्यास 17 टक्के सुट असल्यामुळे 31 जुलै पर्यंत करभरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. नागरिकही सूट मिळवण्यासाठी कर भरण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. 

मागील चार वर्षाची 400 कोटींची वसुली करण्याचे लक्ष्य असलेल्या महापालिकेला एकावर्षाचे 150 कोटी कसे वसुल होणार असला प्रश्‍न पडला होता. मे महिन्यापासनू पहिल्यांदाच जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले आहे. 26 जुलै सुट्टीच्या दिवशी 1 कोटी 56 लाख 33 हजार 886 रुपये कररुपात गोळा झाले. त्यामुळे आतापर्यंत  एकूण 23 कोटी 26 लाख 70 हजारांचा करभरणा झाला आहे. 

महापालिकेच्या एकुण कर रकमेनुसार हा आकडा मोठा नसला तरी कराला विरोध होत असताना नागरिक कर भरत असल्यामुळेे पालिका आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. मालमत्ताधारकांना 17 टक्के सवलतीचा लाभ मिळावा यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. पनवेल पालिकेच्या संकेत स्थळावर नागरिकांना कर भरता येणार आहे. तसेच प्रभाग कार्यालय किंवा पालिका मुख्यालयातही करभरणा सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे 31 जुलैला शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या दिवशीही प्रभाग कार्यालय व मुख्यालयातील मालमत्ता विभागाचे कार्यालय सुरु असणारा आहे. गुरुवारी दिवसभरात 3 कोटी 1 लाख 11 हजार 329 रुपयांचा कर संकलित झाला आहे. 

  • करप्रणालीत राजकारण आणू नका
     रस्त्यावर विरोध आणि सभागृहात तटस्थ राहून करप्रणालीला छुपा पाठिंबा अशी संशयास्पद भूमिका घेऊन नागरिकांचे संविधानिक कर्तव्य असलेल्या करप्रणालीत राजकारण आणू नका, अशी टीका पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी केली आहे. कर भरून शहराच्या विकासाला सहकार्य करा, असे आवाहन शेट्टी यांनी नागरिकांना केले आहे. संतोष शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून, कर का आवश्यक आहे याबाबत भूमिका मांडली आहे. कर भरून विकासाला हातभार लावणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या दिशाभूल करणार्‍या आवाहनाला बळी न पडता आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे मतही शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
  •  25 जुलैला कर संकलन 1 कोटी 56 लाख 33 हजार 886
  •  27 जुलैला कर संकलन 2 कोटी 15 लाख 58 हजार 601
  •  28 जुलैला 2 कोटी 17 लाख 18 हजार 939 
  •  29 जुलैला 3 कोटी 1 लाख 11 हजार