आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका

ट्रायच्या सूचना 

नवी दिल्ली : कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नये, असं आवाहन आधार जारी करणार्‍या प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे प्रमुख आर.एस. शर्मा यांच्या आधार हॅकिंग चॅलेंजच्या वादानंतर यूआयडीएआयनं एक सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार कोणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नये असं आवाहन आधार प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे.

ट्रायचे प्रमुख शर्मा यांनी आधारच्या सुरक्षेचा दावा करण्यासाठी 12 अंकी आधार क्रमांक ट्विटरवर शेअर केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर 1 तासातच त्यांचं आधार हॅक झालं. शर्मा यांच्या बँक अकाऊंटची देखील माहिती असल्याचं हॅकरने म्हटलं. पण शर्मा यांनी ही गोष्ट खोटी असल्याचं म्हटलं.

युआइडीएआयने आता सूचना दिल्या आहेत की, दुसर्‍याच्या आधार क्रमांकासोबत काहीही चुकीचं करणं हा एक गुन्हा आहे. जर कोणी असं केलं किंवा करण्यासाठी प्रेरित केलं तर त्याला शिक्षा होऊ शकते. लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी ट्रायचे प्रमुख शर्मा यांनी केलेल्या दाव्याचा मुद्दा लोकसभेत मांडला. शर्मा यांच्या अशा करण्याने लोकांमध्ये त्यांच्या खासगी माहितीविषयी चिंता निर्माण झाली आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.