दिव्यांगाच्या शिक्षणासाठी पालिकेचा पुढाकार

पनवेल  : दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. घरोघरी जाऊन दिव्यांग मुले शोधून त्यांच्या पालकांचे प्रबोधन करुन त्यांना शाळेत घातले जावे, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. पालिकेच्या गटशिक्षण विभागातील दोन तज्ज्ञ आणि सात विशेष शिक्षक त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

पनवेल तालुक्यात 0 ते 18 वर्षे वयोगटातील एक हजार 252 दिव्यांग विद्यार्थी आहेत. वाचादोष, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, दृष्टिदोष, अंधत्व, अस्थिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात अशा समस्या असणारे विद्यार्थी अनेक आहेत. अशा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी पनवेल गटशिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. अंध विद्यार्थ्यांना ब्रेल पाटी, सीडी प्लेअर, अंधांची काठी दिली जाते. कर्णबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र दिले जाते, विशेष शिक्षकांमार्फत शिकवले जाते. मतिमंद मुलांना व त्यांच्या पालकांना विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन दिले जाते. दृष्टिदोष असणार्‍या विद्यार्थ्यांना चष्मे, लार्ज प्रिंट दिले जाते, चष्मा वाटप शिबीर भरवले जाते. एम.जी.एम. रुग्णालय, कामोठे व हळदीपूरकर रुग्णालय, पनवेल येथे ही शिबिरे घेतली जातात.

अस्थिव्यंग असलेल्यांना कुबड्या, केलीपर दिले जाते, लिहिण्यात काही अडचणी निर्माण होत असतील तर कोणत्या प्रकारचे पेन वापरावे हेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. बहुविकलांग विद्यार्थ्यांना थेरपी दिली जाते. पनवेल तालुक्यात अपंग समावेशित शिक्षणाची 22 केंद्रे आहेत. त्यांत सात शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षकावर तीन केंद्रांची जबाबदारी असून प्रत्येक केंद्रात 10 ते 14 शाळा आहेत. तसेच पूर्वीच्या तुलनेत पालकांत बदल होऊ लागले आहेत व जागरूकता वाढत आहे, त्यामुळे अपंग मुलांना योग्य त्या शाळेत घालण्याचे प्रमाण वाढल्याचे आहे. गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.