‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ बाबत आयुक्तांकडून आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 15, 2022
- 536
नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नवी मुंबई शहरही यामध्ये सहभागी झाले आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी सर्व विभागप्रमुख आणि विभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन नागरिकांना तसेच पर्यटकांना नवी मुंबई शहराविषयी असलेले आकर्षण अधोरेखीत करीत देशातील प्रथम क्रमांकाच्या राहण्यायोग्य शहराचा बहुमान प्राप्त करण्यासाठी शहराविषयी प्रेमाची व अभिमानाची भावना अभिप्रायांच्या माध्यमातून मांडण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
स्वत:च्या मालकीच्या प्रति दिन 450 द.ल.लि. क्षमतेच्या मोरबे धरणाद्वारे नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा करणारे जलसंपन्न नवी मुंबई शहर नेहमीच आघाडीवर राहिले असून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील मानांकन सातत्याने उंचावत राहिलेले आहे. शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खत निर्मिती, फ्युएल पॅलेट्स निर्मिती, डेब्रीजमधून बांधकाम साहित्य व पेव्हर ब्लॉक निर्मिती यामुळे देशातील सर्वोत्तम प्रकल्प मानला जातो. अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञानावर आधारित सांडपाण्याचे शुध्दीकरण करणार्या 7 मलप्रक्रिया केंद्रांव्दारे पर्यावरण संरक्षण केले जात आहे. त्यामधील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उद्याने, सोसायट्या, कारंजे यासाठी वापर केला जातो आहे. त्यामधील 2 मलप्रक्रिया केंद्रात टर्शअरी ट्रिटमेंट प्रकल्प स्थापन करून त्यामधील पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुहांना वापरण्यास आता सुरुवात झालेली आहे. 225 हून अधिक उद्यानांमुळे नवी मुंबईची ओळख ‘गार्डन सिटी’ अशीही करून दिली जाते. 3 सार्वजनिक रुग्णालये, 2 माता बाल रुग्णालये, 23 नागरी आरोग्य केंद्रे याव्दारे उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 117 बालवाड्या 54 प्राथमिक आणि 19 माध्यमिक शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात आहे. 500 हून अधिक बसेसमधून तसेच त्यातही पर्यावरणपुरक बसेसव्दारे समाधानकारक प्रवासी एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. 19 ग्रंथांलयांमधून वाचन संस्कृतीवाढीवर भर दिला जात आहे. 5 अग्निशमन केंद्रांव्दारे शहर सुरक्षेप्रती दक्षता बाळगण्यात येत असून 264 हायटेक सीसीटिव्ही कॅमेरे मुख्य चौकात स्थापित करून शहर सुरक्षेचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने परदेशातून समुद्र ओलांडून फ्लेमिंगो नवी मुंबईत येत असून नवी मुंबईची ओळख ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून दृढ होत आहे. या व अशा अनेक गोष्टींमुळे राहण्यायोग्य शहरांच्या देशपातळीवरील स्पर्धेत नवी मुंबई नेहमीप्रमाणेच आपले वेगळेपण सिध्द करणारे शहर ठरणार असून त्यादृष्टीने ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ स्पर्धेअंतर्गत घेण्यात येणारे नागरिकांचे अभिप्राय आपल्या नवी मुंबई शहराविषयी सर्वोत्तमच असतील असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यादृष्टीने नवी मुंबईकर नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून स्पर्धेची माहिती पोहचवावी व त्यांचे शहराविषयी अभिमान प्रदर्शित करणारे अभिप्राय नोंदवावेत तसेच अभिप्राय नोंदविण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून द्यावीत, याकामी लोकप्रतिनिधींचेही सहकार्य घेण्यात यावे अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच याबाबतची प्रचार व प्रसिध्दीही व्यापक स्वरुपात करावी असेही निर्देशित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai