गणेश मंडळ नोंदणीसाठी धावाधाव

पदाधीकारी अस्वस्थ ः पोलीसांची कडक भुमिका

पनवेल ः पोलीस प्रशासनाने रस्त्यातील मंडप बंदीबरोबर गणेशोत्सवाच्या आयोजनात होणार्‍या नियमांच्या उल्लंघनाबाबत कडक भूमिका घेतली आहे. पोलीस व गणेश मंडळांच्या झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सवासाठी देणगीची सक्ती करू नये, मंडपात बेकायदा कृत्य करू नये, शांतता व सुव्यस्थेला बाधा येईल असे देखावे उभारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंडपात जुगार खेळणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून अशा मंडळांवर पोलिसांची बारीक नजर असल्याचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.

पालिका दरबारी सुमारे 59 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंद आहे. या मंडळांना मंडप उभारणीची परवानगी आणि अन्य सुविधा पालिकेकडून पुरवल्या जातात. याशिवाय इमारतीची गच्ची, मजल्यावर, छोट्या गल्ल्या येथे काही मित्रमंडळी एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली नाही. रस्त्यात अवाढव्य मंडप उभारून वाहतूक आणि पादचार्‍यांची अडवणूक करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना न्यायालयाने चाप लावला आहे. यंदा रस्त्यात मंडप उभारता येणार नसल्याने मंडळांचे पदाधिकारी अस्वस्थ आहेत. यात धर्मादाय आयुक्त कार्यालयात मंडळाची नोंदणी नसल्याने अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात आल्याने पदाधिकार्‍यांची गोची झाली आहे.

काही मंडळांकडे यापूर्वी गोळा होणारी वर्गणी, जाहिरातीतून मिळणारा पैसा याचा हिशेब नसल्याने त्याची जुळवाजुळव करण्यासाठी पदाधिकारी धावपळ करत आहेत. तसेच तातडीने धर्मादाय आयुक्त कार्यालयात मंडळांची नोंदणी करता येईल का याची चाचपणी ही मंडळी करत आहेत. नोंदणी नसल्याने मंडळ बेकायदेशीर ठरू नये, यासाठी आता सर्वांची धडपड सुरू झाली आहे. न्यायालयाने घातलेल्या मंडप बंदीच्या निर्णयावर राजकीय पक्षांकडून तोडगा निघू न शकल्याने आता किमान धर्मादाय आयुक्त कार्यालयात मंडळांची नोंदणी करून देण्यासाठी मदत करावी, असे साकडे या मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते राजकीय नेत्यांना घालू लागले आहेत. तर न्यायालयाने मंडप बंदीबाबत दणका दिल्यामुळे या संदर्भात राजकीय पक्ष सावध भूमिका घेत आहेत.