दिव्यांग मुलांनी लुटला वार्षिक क्रीडा दिनाचा आनंद
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 09, 2023
- 486
नवी मुंबई ः दिव्यांगांच्या अंगभूत कला व क्रीडा गुणांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने पालिकेच्या ईटीसी केंद्रात विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग मुलांना सामान्य मुलांप्रमाणेच खेळाचा आनंद घेता यावा यादृष्टीने दिव्यांग मुलांच्या वार्षिक क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग मुलांनी उत्साहात वार्षिक क्रीडा दिनाचा आनंद लुटला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाच्या निसंर्गरम्य वातावरणात या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये धावणे, सॅक रेस, ससा उडी, बेडूक उडी, सॉफ्ट थ्रो बॉल, गोळा फेक अशा दिव्यांगाना सहजपणे खेळता येतील अशा विविध खेळांचा समावेश होता. या स्पर्धात्मक खेळामध्ये विजयी झालेल्या दिव्यांग खेळाडूंना ईटीसी केंद्राचे विभागप्रमुख तथा उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार तसेच नमुंमपा परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक तथा शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुसकर आणि क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या हस्ते पदकांसह प्रशस्तीपत्र स्वरुपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
सकाळी 8 वाजता मानवंदना देत या दिव्यांग वार्षिक क्रीडा दिनाची उत्साही सुरुवात झाली. यामध्ये ईटीसी केंद्रातील कर्णबधीर, मतीमंद, अंध, बहुविकलांग विद्यार्थ्यांप्रमाणेच बाह्य रुग्ण विभागातील 2 ते 18 वर्ष वयाच्या दिव्यांगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. दिव्यंगत्वामुळे येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना सहजपणे खेळता येईल व खेळाचा आनंद घेता येईल अशा विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेपेक्षा सहभाग महत्वाचा हे लक्षात घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनीही आपल्या पाल्याप्रमाणेच इतरांनाही प्रोत्साहन देत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. दिव्यांगांकरिता प्रेरणादायी असणाऱ्या या क्रीडा प्रकारांचे नियोजन ईटीसी केंद्रातील शैक्षणिक व्यवस्थापक श्री. दीपक नवगरे आणि स्मिता चौलकर तसेच क्रीडा शिक्षक सुभाष भुसारा व समीर म्हात्रे यांनी उत्तम रितीने केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai