झटपट आणि पौष्टिक डब्बा
- by मोना माळी-सणस
- Jun 17, 2023
- 293
मऊ उपमा
घरी उपमा केल्यानंतर प्रत्येकवेळी जर वेगवेगळा तयार होत असेल तर तुम्ही उपमा रेसिपीच्या या टिप्स नक्कीच वाचायला हव्यात. तुमचा उपमा नेहमीच होईल मऊ आणि चविष्ट. मऊ आणि चविष्ट उपमा बनविण्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व सामान तुम्ही ओट्यावर तयार करून घ्या. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही मऊ उपमा बनवू शकता. उपमा तयार करताना सर्वात पहिले रवा भाजणे ही प्रक्रिया योग्य व्हायला हवी हे कायम लक्षात ठेवा.
साहित्य
- 1 वाटी रवा
- पाणी
- गाजर, वाटाणा, कांदा, टॉमेटो, मक्याचे दाणे (सर्व बारीक चिरलेले आणि तुम्हाला हवे असल्यास)
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- उडदाची डाळ
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 3-4
- आल्याचे बारीक तुकडे
- किंचीत साखर
- फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता
- लिंबू (हवे असल्यास)
- ओलं खोबरं
रवा भाजण्याची प्रक्रिया
मऊ उपमा बनविण्यासाठी ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. नेहमी बारीक अथवा मध्यम रवा घ्यायला हवा. मंद आचेवर साधारण खरपूस होईपर्यंत रवा भाजावा आणि मगच उपमा करावा.
कृती- एका भांड्यात जितका रवा घेतला आहे त्याच्या साधारण दुपटीपेक्षा अधिक पाणी मोजून घ्यावे आणि त्यात मीठ घालून उकळून घ्यावे
दुसऱ्या बाजूला पसरट कढई घ्यावी. त्यात तेल गरम करावे, तेल (तुम्हाला आवड असल्यास तूप वापरले तर उत्तम) गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता, मिरची, आल्याचे तुकडे टाकावे, वरून उडदाची डाळ घालून व्यवस्थित भाजून घ्यावे, चिरलेल्या सर्व भाजी घालून एकदा परतून घ्यावे, त्यानंतर त्यात भाजलेला रवा मिक्स करून घ्यावा आणि पुन्हा सर्व एकत्र करून मंद आचेवर 2 मिनिटं भाजावे. भाजल्यावर त्यात उकळलेले पाणी घालावे आणि मिक्स करून त्यावर झाकण ठेवावे. हे सर्व करत असताना गॅस मंद आहे याची काळजी घ्या. साधारण 5 मिनिट्सने तुमचा मऊ उपमा तयार होतो. डिशमध्ये हा गरमागरम उपमा काढा आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घाला. बाजूला लिंबू ठेवा आणि खायला द्या.
महत्त्वाच्या टिप्स
- रवा अति भाजू नका. गोल्डन रंग होऊ देऊ नका
- तुम्हाला हवी ती भाजी उपम्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. मात्र कधीही बटाट्याचा वापर करू नका.
- उडदाची डाळ आवडत नसेल तर चण्याची डाळही तुम्ही वापरू शकता
- कांदा आणि टॉमेटो बारीक चिरलेला असावा.
मॅगी कम भाजी
मॅगी हा मुलांचा आवडता पदार्थ. पण तो कितीही आवडीचा असला तरी पौष्टिक मात्र अजिबात नाही. शरिरासाठी चांगली नसलेली मॅगी तुम्ही भरपुर भाज्या घालून बनवली तर त्यानिमित्ताने भाज्या मुलांच्या पोटात जातील. यासाठी अर्धा मॅगीचा तुकडा (नावापुराता) व भरपुर भाज्या घाला. गाजर, टोमॅटो, मटर, शिमला मिरची, कॉर्न, फरसबी, कांदा घालून मॅगी बनवा. याचप्रकारे तुम्ही नुडल्सही बनवू शकता. पण हा मॅगी आणि नूडल्सचा पर्याय ऑप्शन्ल असूद्या. रोजच्या टिफीनमध्ये याचा समावेश करु नका.
गव्हाचा गोड पोळा
एकदम झटपट आणि पोष्टिक असणारा पदार्थ म्हणजे गव्हाचा गोड पोळा. यासाठी एकवाटी गव्हाचे पीठ, गुळ आणि तेल किंवा तूप एवढेच पदार्थच पुरेसे आहेत. एक वाटी गव्हाच्या पीठात अर्धी वाटी गुळ घाला. त्यात पाणी टाकून पातळ मिश्रण एकजीव करा. डोशासाठी जसे पीठ असते त्याप्रकारे थोटे घट्टसर मिश्रण तयार करा. गरम तव्यावर थोडे तेल किंवा तुप पसरवा. त्यावर हे पोळे घाला. 1 मिनिटभर झाकण ठेवून पलटवा. पुन्हा 2 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्या. गोड पोळा तयार. (गुळ जास्त झाले तर तव्यावर पोळे चिटकु शकतात. त्यामुळे प्रमाण योग्य असावे.)
दहीभात
पचायला हलका, पोष्टिक शिवाय चवदार असा दहीभात एखाद दिवशी मुलांना डब्ब्यात देवू शकता. शिजवलेल्या भातावर थंड दही घालून त्यावर मिरची, कडीपत्ता, मोहरीची फोडणी आणि मीठ घालून परतवा. साधासोपा दहीभात तयार.
शेवयांचा उपमा
शेवयांचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्ता आहे. तुम्हाला हा बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. तसंच अगदी कमी वेळात हा नाश्ता तयार होतो. त्यासाठी जास्त वेळ घालवण्याची गरज भासत नाही.
साहित्य
- शेवया
- कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर
- कोथिंबीर
- मिरची
- चवीनुसार मीठ
- फोडणीचं साहित्य
शेवयांचा उपमा बनवण्याची पद्धत
- एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा.
- त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा. पाणी उकळलं अर्थात शेवया शिजल्या की पाणी काढून टाका.
- नंतर दुसऱ्या कढईत तेल घ्या.
- त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतावा. मग तुम्हाला हव्या त्या भाज्या त्यामध्ये कापून घाला.
- वरून शेवया घाला. नीट मिक्स करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून नीट शिजवून घ्या.
- वरून मीठ आणि कोथिंबीर घाला. तुमचा उपमा तयार.
आप्पे अर्थात पानीयरम
आप्पे हा आपल्याकडील अतिशय प्रिय नाश्ता आहे. आप्पेपात्रातील गरम गरम आप्पे चटणीबरोबर खायला खूपच मजा येते. पण बऱ्याचदा हे बनवणं कठीण वाटतं. पण हे सोपं आहे.
साहित्य
- जाड रवा
- ताक
- मीठ
- जिरे
- ठेचलेल्या मिरच्या
- आल्याची पेस्ट
- चिरलेला कढीपत्ता
- तेल
- हवा असल्यास चिरलेला कांदा
आप्पे बनवण्याची पद्धत
- रवा आणि ताक तासभर एकत्र भिजवून ठेवा.
- त्यात जिरे, मिरची, कढीपत्ता, आल्याची पेस्ट, कांदा, मीठ सर्व मिक्स करून घ्या. तुम्हाला हवा असल्यास, अगदी चिमूटभर सोडा मिक्स करा.
- आप्पेपात्र गरम करत ठेवा.
- त्यावर तेल सोडा आणि चमच्याने हे मिश्रण थोडे थोडे त्यात घाला.
- साधारण दोन ते तीन मिनिट्स झाल्यावर बाजू बदला आणि शिजू द्या. काट्याने दुसरी बाजू पलटून शिजू द्या. तयार झालेले आप्पे नारळाच्या चटणीसह खायला द्या.
बेसन चिला
सर्वात सोपी आणि सकाळी व्यवस्थित पोट भरणारी अशी ही झटपट नाश्ता रेसिपी आहे. बेसनचा पोळा अर्थात चिला आपण नेहमीच घरी करतो. कसा झटपट बनवायचा बघूया
साहित्य
- बेसन
- ओवा
- लाल तिखट
- काळी मिरी पावडर
- धने पावडर
- हळद
- मीठ
- चिरलेला कांदा, टॉमेटो, मिरची
- कोथिंबीर
- पाणी
- तेल
बनवण्याची पद्धत
- वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठात गुठळी राहणार नाही अशा तऱ्हेने पाण्याचा वापर करून भिजवून घ्या.
- अति जाड अथवा अति पातळ भिजवू नका.
- तव्यावर तेल सोडून त्यावर हे मिश्रण घाला आणि वरून झाकण ठेवून शिजू द्या. गरमागरम चिला तयार. सॉसबरोबर खायला द्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस