109 कुटुंबांचा जीव टांगणीला
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 30, 2023
- 277
सोसायटीतील अतिक्रमणांकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
नवी मुंबई : नेरुळ येथील कॉस्मोपॉलिटन-2 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चक्क स्ट्रक्चरल ऑडिट अहवालातून 27 रो हाऊसेस आणि 20 दुकाने वगळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी वास्तव्यास अतिशय धोकादायक म्हणून महापालिकेनेच जाहीर केलेल्या या सोसायटी इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. एकीकडे महापालिकेने इथल्या इमारतीत राहणाऱ्या 109 कुटूंबांना इमारत तातडीने खाली करण्यासाठी सोसायटीच्या गेटवर फलक लावला आहे. तर दुसरीकडे इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने येथील सूमारे 109 कुटंबांचा जीव टांगणीला लागला आहे.
सिडकोने नेरुळ, सेक्टर-17 येथील 182 क्रमांकाचा भूखंड निवासी व व्यावसायिक वापरासाठी भाडेकरारावर कॉस्मोपॉलिटन -2, पुनीत पार्क यांना दिला आहे. सदर भूखंडावर तळ मजला अधिक 7 माळ्याची इमारत ज्यामध्ये ए, बी, सी आणि डी अशा चार विंग आहेत. याशिवाय सदर भूखंडावर 27 रो हाऊसेस व 20 दुकाने उभारण्यात आली आहेत. संपूर्ण भूखंडावर निर्माण करण्यात आलेल्या इमारती, रो हाऊसेस आणि दुकाने यांची कॉस्मोपॉलिटन-2 को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या नावाने सदर संस्था निबंधक सहकारी संस्था, सिडको यांच्याकडे सन-1999 मध्ये नोंदणीकृत आहे. कॉस्मोपॉलिटन हौसिंग सोसायटीच्या आवारातील 27 रो हाऊसेसमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्याबाबत अनेकवेळा संस्थेने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे लेखी तक्रारी करून देखील त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त, कनिष्ठ अभियंता आणि संस्थेच्या आवारात अतिक्रमण करणारे रो हाऊस मालक यांच्यात असलेले आर्थिक संबंध यामुळेच संस्थेच्या आवारातील अतिक्रमण हटविण्याऐवजी ते अधिकृत करण्यासाठी महापालिका अधिकारी गेले काही वर्षे प्रयत्न करत असल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, कॉस्मोपॉलिटन-2 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील संपूर्ण बांधकामे धोकादायक असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून महापालिकेकडे अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर निर्णय घेण्यासाठी अतिक्रमण विभागाने तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी घेतला. संस्थेने सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालावर निर्णय देताना कॉस्मोपॉलिटन सोसायटीतील 27 रो हाऊसेस आणि 20 दुकाने वगळून उर्वरित चार विंग असलेली 7 मजली इमारती सी -1 प्रवर्गात (म्हणजेच राहण्यास अति धोकादायक, अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करणे) मोडत असल्याने महापालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत या सोसायटीचे नाव नुकतेच प्रसिध्द केले आहे. तसेच याबाबतची नोटीस महापालिकेने 23 जून रोजी सोसायटीच्या गेटवर देखील लावली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai