Breaking News
वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.
जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून जयंत सावरकर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. पण नंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं”. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर उद्या (25 जुलै) अंत्यसंस्कार होणार आहेत.
जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी जयंत सावरकर यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. ‘अपराध मीच केला' (गोळे मास्तर), ‘अपूर्णांक', 'अलीबाबा चाळीस चोर', ‘अल्लादीन जादूचा दिवा', ‘आम्ही जगतो बेफाम', ‘एकच प्याला' अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. ‘एकच प्याला' नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली आहे. विनोदीसह गंभीर भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरील मालिकेत ते दिसले होते. ‘समांतर' या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.
नाटकांबरोबरच जयंत सावरकर यांनी चित्रपटांमध्ये देखील काम केलं होतं. येड्यांची जत्रा,बिस्कीट,विघ्नहर्ता महागणपती, हरिओम विठ्ठला, पोलीस लाईन या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच सिंघम, वास्तव : द रिॲलिटी, बडे दिलवाला, सिंघम या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांनी कामे केली आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai