Breaking News
मुंबई ः मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या मंजुरीनंतर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यावरच या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
मराठा आरक्षणासाठी सरकारनं राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले. आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले. यानुुसार राज्यातील सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आरक्षण लागू होईल. या आरक्षणामुळे मराठा समाजाला सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालये, जिल्हा परिषद, विद्यापीठे आणि इतर सरकारी कार्यालयांमधील नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळेल.
मराठा आरक्षणासाठीच्या विधेयकाला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. आता हे विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात येईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यपालांकडे स्वाक्षरीकरिता पाठवण्यात येईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.
मराठा आरक्षणासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असून आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाणार आहे. आधीच्या त्रुटी दूर करून आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत नक्कीच टिकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे. ओबीसी बांधव असो, किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक, आणि नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे राजकीय आरक्षण मिळालेले नाही. राज्यातील त्याच्या संख्याबळानुसार या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व असल्यामुळे, या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही, असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai