दर दोन मिनिटांनी धावणार लोकल
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 20
कवच 5.0 प्रणारीची लवकरच अमंलबजावणी
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. वाढती गर्दी, वेळेचे नियोजन आणि सुरक्षितता ही मोठी आव्हाने लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणालीच्या पुढील टप्प्यातील कवच 5.0 विकसित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याच्या अंमलबजावणीनंतर दोन लोकल गाड्यांमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी, भविष्यात दर दोन मिनिटांनी लोकल सेवा उपलब्ध करणे शक्य होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वाढत्या प्रवासीसंख्येला सामोरे जाण्यासाठी ही अत्याधुनिक प्रणाली विकसित केली जात आहे. कवच 5.0मुळे लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होणार असून, रेल्वे गाड्यांमधील सुरक्षित अंतर राखत अधिक फेऱ्या चालविणे शक्य होईल. ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई लोकलच्या दररोजच्या फेऱ्यांची संख्या सुमारे 4 हजारांपर्यंत वाढविणे शक्य होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वर्षभरापूर्वी कवच 5.0ची घोषणा केली होती. सध्या या प्रणालीची तांत्रिक वैशिष्ट्ये अंतिम करण्याचे काम संशोधन, डिझाइन आणि मानक संस्था करत आहे. त्यानंतर मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र कवच 5.0 प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- काय आहे कवच 5.0?
कवच 5.0 ही अत्याधुनिक स्वदेशी सुरक्षा प्रणाली असून, सिग्नलची माहिती थेट लोकोपायलटच्या चालक कक्षातील डिस्प्लेवर दिसणार आहे. त्यामुळे ट्रॅकवरील प्रत्येक सिग्नलकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज कमी होईल. मुसळधार पाऊस, दाट धुके किंवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही ही प्रणाली प्रभावीपणे कार्य करेल. लोकोपायलटने सिग्नल ओलांडण्याचा धोका निर्माण झाल्यास किंवा रेल्वेचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा वाढल्यास कवच 5.0 प्रणाली स्वयंचलितपणे ब्रेक लावून संभाव्य अपघात टाळण्यास मदत करेल. तसेच ट्रेनच्या हालचालीनुसार सिग्नल आपोआप नियंत्रित होणार असल्याने गाड्या सुरक्षित अंतर राखून कमी वेळेत धावू शकतील. रेल्वे प्रशासनाच्या मते, कवच 5.0 ही प्रणाली मुंबई लोकल सेवेसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता असून, त्यामुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद, वक्तशीर आणि आरामदायी होईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai