14 गावांच्या समावेशावरुन शिंदे-नाईक आमनेसामने
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 05, 2024
- 604
एमएमआरडीए-सिडकोने विकास करण्याची नाईकांची मागणी
नवी मुंबई : नगरविकास विभागाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास आ. गणेश नाईक यांनी विरोध केला असून पायाभूत सुविधा पुरवल्यानंतर आणि तेथील अतिक्रमणांचे निष्कासन केल्यानंतर सदर गावे समाविष्ट करावीत अशी मागणी केली आहे. तेथील सुविधांचा कोट्यवधींच्या खर्चाचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको अशी भुमिका घेतल्याने लवकरच शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष राज्यात पाहायला मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेच्यावेळी कल्याण लोकसभा मतदार संघातील 14 गावांचा समावेश 1991 साली पालिका क्षेत्रात करण्यात आला होता. या 14 गावांमध्ये त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेने बाळे येथे माता बाल रुग्णालय केंद्र, तलावांचे सुशोभिकरण व रस्त्यांची कोट्यावधी रुपयांची कामे केली होती. परंतु, स्थानिकांनी महापालिका क्षेत्रात समाविष्ट होण्यास विरोध केल्याने 2007 साली अधिसूचना काढून ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीतून वगळण्यात आली होती. या 14 गावांमध्ये अनियंत्रित विकास झाला असून शेकडोंनी अनधिकृत बांधकामे उभी राहली आहेत. त्याचबरोबर तेथे पायाभुत सेवासुविधांचीही वानवा आहे. गेली अनेक वर्ष ही गावे अन्य नियोजन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास शासनाने अनेक प्रयत्न केले परंतु, त्यास अपयश आल्याने या गावांचा विकास अनियोजित पद्धतीने झाला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ही 14 गावे मोडत असल्याने या गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आल्याचे बोलले जाते. 14 गावांच्या नवी मुंबई महापालिका हद्दीतील समावेशास आपला विरोध असल्याची स्पष्ट भूमिका ऐरोलीतील भाजप आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यात काढलेल्या एका आदेशानुसार या गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार नवी मुंबई महापालिकेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून हे अधिकार काढून घेताना महापालिकेस हे अधिकार दिले गेल्याने या ठिकाणी बांधकाम परवानग्या देणे, मुलभूत सेवा सुविधा देणे, विकास आराखडा तयार करण्याची महत्त्वाची कामे आता महापालिकेस करता येणार आहेत. या कामापोटी पालिकेला हजारो कोटी रुपये खर्च येणार असल्याने नवी मुंबईच्या करदात्यांवर तो अन्याय असेल अशी भुमिका नाईकांनी घेऊन या समावेशास विरोध केला आहे. नुकतीच नाईक यांनी आयुक्त शिंदे यांची भेट घेऊन या क्षेत्रात एक रुपया जरी खर्च केला तरी आपल्याशी गाठ आहे असा सज्जड दम अधिकाऱ्यांना दिला आहे.
- महायुतीत विसंवाद
मुलाचा आग्रह आणि स्थानिक मतांचे गणित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनीही हा निर्णय तातडीने घेतल्याचे बोलले जाते. या निर्णयामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे आ. गणेश नाईक आणि शिंदे समर्थक विजय चौगुले यांनी वेगळी भुमिका घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्यात भाजपा- राष्ट्रवादी व शिवसेना यांचे सरकार असल्याने एकमेकांच्या कुरघोडीतून महायुतीतील विसंवाद समोर आला आहे. याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- सिडकोमार्फत विकास करावा- चौगुले
14 गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे शिंदे सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी स्वागत केले आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी 2017 साली महापालिकेने ही गावे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता दिल्याचे इतिवृत्त प्रसिद्ध केले. यावेळी त्यांनी सदर गावे सिडको मार्फत विकसीत करण्याची मागणी केली. या 14 गावांमध्ये शेकडो हेक्टर जमिन शासकीय असून तिचा फायदा विकासासाठी होईल असे सांगितले. त्यामुळे ठाण्यातील क्लस्टर योजनेसारखी एखादी योजना मुख्यमंत्री शिंदे हे या 14 गावांसाठी राबवतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai