घोट नदीत जलप्रदूषण

पनवेल ः प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणार्‍या तळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. प्रक्रिया न करता कंपन्या सांडपाणी घोट नदीत सोडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांकडे त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. 

तळोजातील जलप्रदूषण कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असला, तरी अद्याप जलप्रदूषण सुरुच आहे. येथील कंपन्यांमधून सोडलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून खाडीत पाणी सोडले जाते. सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रचे नूतनीकरण करून तळोजातील सर्व कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्यामुळे तळोजातील जलप्रदूषण आटोक्यात आल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता, मात्र तळोजातील काही कंपन्या घोट नदीत सांडपाणी सोडत असल्यामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. एमआयडीसी परिसरात असलेल्या घोट, सिद्धिकरवले, चाळ, तोंडरे, भोईरवाडा, खैरणे, ढोंगर्‍याचा पाडा आदी गावांच्या परिसरात असलेल्या कंपन्या थेट नदीत पाणी सोडत असल्याची तक्रार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांसह तळोजा एमआयडीसीचे पदाधिकारी, पनवेल महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या पदाधिकार्‍यांना भेटून लेखी तक्रार करण्यात आली आहे. कंपन्यांमधून सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. यामुळे जलप्रदूषणासोबत वायूप्रदूषणदेखील होत आहे. त्यामुळे या प्रदूषणावर कारवाई करण्याची मागणी शिवेसेनेकडून करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांसह पदाधिकार्‍यांनी या तक्रारी केल्या आहेत. शिवसेनेचे तालुका संघटक दीपक निकम यांनी तळोजा परिसरात प्रदूषण होत असल्याचा दावा केला असून यावर लवकर कारवाई झाली नाही, तर थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना भेटून तळोजातील ग्रामस्थांची व्यथा सांगितली जाईल, असे सांगण्यात आले.