पालिकेच्या अर्थसंकल्पाने ओलांडला 5 हजार कोटींचा टप्पा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 231
1301.04 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.5709.95 कोटींचे बजेट
नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2024-25 चा सुधारित आणि सन 2025 26 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी मंजूर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे सादर केली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु.1686.06 कोटी व जमा रु. 3403.82 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु.5089.88 कोटी आणि रु.3788.84 कोटी खर्चाचे सन 2024-25 चे सुधारित अंदाज आहेत. तसेच रु. 1301.04 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.5709.95 कोटी जमा व रु.5684.95 कोटी खर्चाचे आणि रु.25.00 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2025-26 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर व उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर यांनी आयुक्तांकडे सादर केले व मंजूर करण्यात आले. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरण सचिव तथा उद्यान विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे व नयना ससाणे यांनी आयुक्तांकडे सादर केले व तेही मंजूर करण्यात आले.
महापालिकेच्या निवडणूका अद्याप होऊ शकल्या नाहीत म्हणून प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले जात आहे. सर्व समाज घटकांचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे आवश्यक सर्व सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.तसेच लिखीत स्वरुपातनागरिकांचे प्रतिनिधीत्व अर्थसंकल्पात यावे यासाठी अभिप्राय/सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तसहभाग नोंदवला आहे.त्यामधील बहुमूल्य सूचनांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक, या नात्याने एक स्वच्छ, सुंदर शहरापासून पुढे एक राहण्यायोग्य सर्वेात्तम दर्जाचे शहर साकारण्याचे स्वप्न घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. मुंबई प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण क्षेत्राला ‘विकास केंद्र’म्हणून उदयास आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नियोजन करीत आहे.त्या अनुषंगाने त्या विकासकेंद्राचा हिस्सा बनण्याची संधी व जबाबदारी आपल्यावर आहे. ही बाब केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आलेली आहे. -आयुक्त
गतीमान व प्रभावी वसूलीकरिता स्वतंत्र संस्थेची नियुक्ती : गतीमान व प्रभावी वसूलीकरिता एका संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही संस्था सर्व करधारकांकडून त्यांच्या कराबाबतची अद्ययावत माहिती घेऊन त्यांनी विकसित केलेल्या मोबाईल ॲपमध्ये त्या माहितीची नोंद करेल. करधारकांना कर भरणेबाबत त्यांच्या मोबाईलवर सूचना प्राप्त होणार आहेत.
जाहीरात गॅन्ट्री व डिजिटल होर्डिंगमाध्यमातून उत्पन्न वाढ : पालिकेतील मोठया रस्त्यांच्या लगत किंवा मोक्याच्या ठिकाणी जाहिराती करण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी मोठया गॅन्ट्री उभ्या करुन जाहिरातीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. ज्याआधारे महापालिकेस मोठे उत्पन्न प्राप्त होईल.
गुणवत्तापूर्ण शिक्षण :-
अटल लॅब उभारणार : विदयार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी ज्ञान मिळविणे व विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी शासनाच्या अटल लॅब योजनेप्रमाणे महापालिकेच्या शाळांमध्ये अटल लॅब उभारण्यात येणार आहे.
डि.बी.टी.ऐवजी गणवेश व शालेय साहित्याचे वितरण महापालिकेमार्फत : मागील 3-4 वर्षापासून पालिकेमार्फत विद्यार्थांना शालेय साहित्य, गणवेश यांचे डीबीटी मार्फत वितरण करण्यात येत होते. मात्र मार्फत पालकांचे देयक अदा करण्यात विविध अडचणी येत होत्या. त्यामुळे गणवेश आणि शालेय साहित्य सन 2025-26 मध्ये महापालिकेमार्फत वाटप करण्यात येणार आहे.
अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण:- विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्यामूल्यमापनाकरिता ‘प्रथम’ या संस्थेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील महानगरपालिका शाळांमध्ये भाषा व गणित विषयक मूल्यमापन करण्यात आले आहे.
आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण :-
डायलिसीस :- वाढती डायलिसीस रुग्णसंख्या विचारात घेता पालिका कार्यक्षेत्रामध्ये(1) स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन, से.14 वाशी. (2)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, से.08, सी.बी.डी.अशा दोन ठिकाणी बाहययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर डायलिसीस सुविधा सन 2024-25 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर सेंटरच्या माध्यमातून सन 2025-26 मध्ये साधारणत: 6552 रुग्णांना डायलिसीस सुविधेचा लाभ घेता येईल.
आयुष रुग्णालय : शहरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे. शहरातील रुग्णांसह निरोगी नागरिकांचे आरोग्य स्वास्थ्य उत्तम रहावे याकरिता आयुर्वेदिक रुग्णांलयाची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जागा उपलब्ध झाल्यानंतर नमूद केल्याप्रमाणे किमान 02 आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करणेबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
पशू वैदयकीय दवाखाना: पशूवैदयकीय दवाखाना उभारुन त्या रुग्णालयासाठी सिटी स्कॅन, सोनोग्राफी सुविधा पुरविणेकरिता ठेकेदार नियुक्ती करण्याची प्रक्रिया कार्यप्रणालीत आहे. पशू रुग्णालय चालविण्यासाठी पीपीपी तत्वावर नियुक्ती करण्याची प्रक्रिया कार्यप्रणालीत आहे.
समाजविकास:
बालभवन निर्मिती : बालकांच्या मनोरंजन व सर्वांगीण विकासासाठी बालभवन निर्मिती करण्यात येत आहे.
नोकरदार महिलांकरिता वसतिगृह :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नोकरीनिमित्त बाहेरून येणाऱ्या महिलांना राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्याकरिता अत्याधुनिक सेवा-सुविधायुक्त वसतिगृह उभारणे.
नवीन ग्रंथालय तयार करणे : मुख्यालयामध्ये ग्रंथालयाची मागणी अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांची होती. त्यामुळे मुख्यालयामध्ये ग्रंथालय असल्यास नवी मुंबई पालिका अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार यांना ग्रंथालयाचा लाभ घेता येईल.
नवीन ईटीसी सेंटर उभारणे :-वाशी येथील भव्य केंद्रा व्यतिरिक्त ऐरोली येथे केंद्राचे विस्तारीकरण व विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरुन दिघा, ऐरोली, घणसोली येथील लाभार्थ्यांना वाशीपर्यंत प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही.
संक्रमण शिबीर :- महानगरपालिकेच्या प्रकल्पांमधून बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांस तात्पुरत्या स्वरुपात संक्रमण शिबीरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. तथापि महानगरपालिकेकडे स्वत:चे संक्रमण शिबीर नाही. यास्तव सिडकोकडून याकरिता काही सदनिका उपलब्ध करुन घेण्याचा मानस आहे.
तृतीयपंथी व्यक्तींकरीता प्रशिक्षण केंद्र उभारणे :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींकरिता बहुउद्देशीय सुविधा केंद्र स्थापन करुन त्यामार्फत त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करणे तसेच त्यांच्याकरिता विविध योजना राबविणे.
पर्यटन स्थळ विकास :-
शहर पर्यटन धोरण :-भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने विकास साध्य करण्यासाठी तसेच पर्यटनाला चालना मिळावी याकरिता पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याकरिता ‘पर्यटन विकास आराखडा ’तयार करण्यात येत आहे.
संग्रहालय :-संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विशिष्ट विषयापुरती, तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूची मांडणी केलेली असते, तर संग्रहालयात ही मांडणी कायमची व रचनाबध्द असते. अशी वास्तू न.मुं.म.पा. मध्ये भविष्यात उभारण्यात आल्यास त्या वास्तूचा न.मुं.म.पा. क्षेत्रातील विविध वयोगटातील जनतेला निश्चित फायदा हाईल.
मत्स्यालय :-बेलापूर विभागातील नेरूळ, से. 28,भू.क्र.5ए येथील 7773.68 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड मत्स्यालय या प्रयोजनाकरिता राखीव ठेवण्यात आलेला आहे. सदर भूखंडावर आधुनिक मत्स्यालय बांधणे प्रस्तावित आहे.
खुला रंगमंच:-घणसोली, सेक्टर-8,भूखंड क्र. 22 हा लोककला केंद्रासाठी (नाट्यगृह) राखीव असलेला एकूण 3542.28 चै.मी. क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेस हस्तांतरित झालेला आहे. सदर भूखंडावरील डेब्रीज हटवून सुरक्षाभिंत बांधण्याचे काम निविदा मंजूरी प्रक्रियेत आहे, सदर ठिकाणी तळमजल्यावर प्रवेश लॉबी व 68 कार पार्कींग, पहिल्या मजल्यावर 59 कार पाकग, दुसऱ्या मजल्यावर 350 आसनाचे खुले मिनी थिएटर व प्रोजेक्टर रुम तसेच, 350 आसनांचे व खुले ॲम्फिथिएटर, 2 ग्रीन रूम, एक रंगीत तालीम कक्ष, 5 गेस्ट रूम इ. सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तिसऱ्या मजल्यावर एकूण 2 मल्टीपर्पज कल्चरल हॉलप्रस्तावित करण्यात आलेलेआहेत. या इमारतीस दोन जीने व तीन पॅसेंजर लिफ्टप्रस्तावित आहेत.
बोटॅनिकल गार्डन विकसित करणे:-आगामी अर्थसंकल्पीय वर्षात निसर्ग उद्यान, कोपरखैरणे येथील अविकसित भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटॅनिकल उद्यान तयार करण्याचे नियोजन आहे. नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होत असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वनस्पती शास्त्रासंबंधित भर पडण्यासाठी यामुळे मदत होईल. याकरिता अंदाजपत्रकामध्ये रु. 800 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
सुलभ वाहतूक :-
उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना (नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम):-
नवीन बसमार्ग सुरु करणे: मुंबई महानगर क्षेत्रात सेवा विस्तारून जास्त उत्पन्नाच्या बसमार्गावरील सेवेत वाढ करण्यात येणार आहे.
प्रवासी वाढवा अभियान : बस वेळापत्रकांचे अनुपालन करुन दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ करण्यात येईल.
वाशी, सेक्टर 9 ए वाणिज्य संकुल : वाशी सेक्टर-9 ए येथील वाणिज्य संकुल भाडेतत्वावर देऊन परिवहन उपक्रमास वार्षिक रु.32 कोटींचे वाहतुकबाह्य उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
जाहिरातींच्या महसूलात वाढ : सुधारित होर्डींग धोरण तयार करुन त्यानुसार टर्मिनस/डेपोवर जाहिरात डिजिटल होर्डिंग्ज जाहिरात महसूल वाढ करण्यात येतील.
शाश्वत जल व्यवस्थापन:
स्काडा 2.0: पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा व्यवस्थेकरिता विविध प्रकाराच्या व्यासाचे व्हॉल्व्ह, ॲक्च्युएटर्स, फ्लोमीटर्स बसविणे तसेच इनस्ट्रुमेन्टेशन व स्काडा ऑटोमेशनचे काम करणेयाबाबींचा समावेश असून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेत आहे.
वैकुंठमविकास/महाप्रस्थान :-
हैद्राबाद येथील ‘महाप्रस्थान’ या स्मशानभूमीच्या धतवर नवी मुंबई क्षेत्रातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधी करण्यासाठी लागणारे साहित्य, अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था, स्नानगृह, चेंजिंग रुम, उद्यान, सुशोभिकरण अशा सुविधा सर्व मध्यवत स्मशानभूमींमध्ये करणे प्रस्तावित आहे.
पायाभूत सोयी सुविधा:-
सिडकोकडून भूखंड हस्तांतरण :-महानगरपालिकेस सार्वजनिक वापर व सोयी सुविधांसाठी सिडको व एमआयडीसी या प्राधिकरणांकडून सार्वजनिक प्रयोजनाच्या एकूण 1063 भूखंडांची मागणी करण्यात आलेली आहे. टप्प्याटप्प्याने हस्तांतरित होणाऱ्या सदर भूखंड खरेदीसाठी 50.00 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
अग्निसुरक्षा :-
हायप्रेशर पोर्टेबल पंप खरेदी करणे :-आगीच्या वदवर जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासल्यास, नजिकच्या पाण्याच्या साठयातूनजसे तलाव, स्वीमिंग पूल, विहीर इत्यादींमधून पाणी खेचून फायर इंजिन वाहनाचा उपयोग न करता थेट फायर फायटींग करण्यास सक्षम असलेले हायप्रेशर पोर्टेबल पंप प्रत्येक अग्निशमन केंद्रासाठी खरेदी करणे प्रस्तावित आहे.
नवीन वायरलेस यंत्रणा बसविणे:-नवी मुंबई महानगरपालिकाअग्निशमनविभागामध्ये सध्या वापरात असलेली वायरलेस यंत्रणा 18 वर्षे जुनी झाली असून, त्याऐवजी नवीन वायरलेस यंत्रणा बसविणे प्रस्तावित आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai