नवी मुंबईकरांना दसऱ्याची दुहेरी भेट
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 23, 2026
- 18
कोपरखैरणेत 650 आसनक्षमतेच्या अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण; 59 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे सेवेत
नवी मुंबई : दर्जेदार शिक्षण आणि सक्षम आरोग्य व्यवस्था या दोन्ही क्षेत्रांत नवी मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण सुविधांचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले. कोपरखैरणे सेक्टर 11 येथील नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळा क्रमांक 94 मध्ये उभारण्यात आलेल्या 650 आसनक्षमतेच्या अत्याधुनिक वातानुकूलित सभागृहाचे तसेच महापालिका क्षेत्रातील 59 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृह उपलब्ध झाले असून नागरिकांना घराजवळच मोफत प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे.
या वेळी बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका शाळांचा गुणात्मक दर्जा उंचावत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले सभागृह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांच्या किरकोळ आजारांवर त्यांच्या घराजवळच उपचार उपलब्ध करून देणारी 59 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ही केंद्रे प्रभावीपणे कार्यरत राहून नागरिकांना दिलासादायक सेवा देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महापौर सुजाता पाटील यांनी महापालिका गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांनाही सुरुवातीपासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे, यासाठी नर्सरीपासून इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले असून त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. याच धर्तीवर आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक स्तरावर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माजी खासदार संजीव नाईक यांनी हे सभागृह विविध कार्यक्रमांसाठी विष्णुदास भावे नाट्यगृहाला चांगला पर्याय ठरू शकते, असे सांगितले. सभागृहाची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये टेलिकन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सभागृहनेते सागर नाईक यांनी प्रास्ताविकात सभागृहाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. 650 आसनक्षमता असलेल्या या वातानुकूलित सभागृहात आधुनिक ध्वनी व प्रकाशयोजना, प्रशस्त रंगमंच आणि उत्कृष्ट ध्वनिकी व्यवस्था उपलब्ध आहे. रंगमंचीय कार्यक्रमांसोबतच पडद्यावर ध्वनीचित्रफिती प्रदर्शित करण्याची सुविधाही येथे करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. एकात्मिक आरोग्य धोरणाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्यवर्धिनी केंद्रांत कोणत्या सुविधा मिळणार?
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि 15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या 59 केंद्रांमधून नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. ताप, सर्दी, खोकला यांसारख्या किरकोळ आजारांवरील उपचारांसह माता व बाल आरोग्य सेवा, गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण, रक्त तपासणी आणि इतर मूलभूत चाचण्या येथे केल्या जाणार आहेत. मधुमेह व उच्च रक्तदाबाचे प्राथमिक परीक्षण तसेच आरोग्यविषयक समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध असेल. आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी आभार प्रदर्शन केले. दसऱ्याच्या सणानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai