शिवसेनेचं पुन्हा चलो अयोध्या

7 मार्चला उद्धव ठाकरे घेणार रामललांचे दर्शन

मुंबई : शिवसेनेने पुन्हा एकदा चलो अयोध्येचा नारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व खासदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लांच दर्शन करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे हे 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. ते विशेष विमानाने अयोध्येत पोहोचतील. दुपारी श्रीरामाचं दर्शन आणि संध्याकाळी शरयू आरती करणार आहेत. हा सोहळा ऐतिहासिक असून सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी केले. सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर गेल्या अनेक दशकांचा हा प्रश्न मार्गी लागला होता. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. या आधी दोन वेळा त्यांनी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्श घेत शरयूची आरतीही केली होती.

राम मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र सरकारने एका ट्रस्टची घोषणाही केली असून त्यावर सदस्यांची नियुक्तीही केली आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने ते अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीही ठाकरे हे अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की मी पुन्हा अयोध्येला येईन. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते अयोध्येत जावून रामललाचं दर्शन घेणार आहे.