महापालिकेच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब
- by संजयकुमार सुर्वे
- Sep 12, 2025
- 516
रुग्णालयीन यांत्रिकी साफसफाईत 7.20 कोटींच्या धुलाईचा महालेखापालांचा अहवाल
नवी मुंबई ः पालिकेचे तत्कालीन आयुक्त एन.रामास्वामी यांच्या कार्यकाळात पालिकेच्या रुग्णालयीन यांत्रिकी साफसफाई कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘आजची नवी मुंबई’ने 2018 साली पत्रकार परिषद घेऊन केला होता. या कामात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा अहवाल रामास्वामी यांनी शासनास पाठवला होता. एवढेच नाही तर शासनाच्या स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाने या व्यवहारास क्लिनचीट दिली होती. परंतु, राज्याचे महालेखापाल यांनी या कामात 7.20 कोटींची सफाई झाल्याचा ठपका अहवालात ठेवल्याने भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जानेवारी 2018 मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयीन साफसफाई कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निविदा अटीशर्तींचा भंग करुन ठेकेदार बीव्हीजी इंडिया प्रा.लि. यांना आवश्यक ते केमिकल्स, कंज्युमेबल्स न पुरवताही देयके अदा केल्याचा आरोप केला होता. पालिका अधिकाऱ्यांनी निविदेमध्ये प्रशासकीय खर्च व सेवा शुल्क या सदराखाली ठेकेदाराला संपुर्ण खर्चावर रक्कम भरण्यास सांगितले होते. ठेकेदाराने प्रशासकीय शुल्कापोटी 20 टक्के तर सेवा शुल्कापोटी 17 टक्के रक्कम भरुन एकुण खर्चाच्या 37 टक्के नफा पालिकेकडून उचलला होता. ही बाब आजची नवी मुंबईने 2018 मध्ये उघडकीस आणून कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे नवी मुंबईतील एकाही आमदाराने या भ्रष्टाचाराबाबत विधानसभेत आवाज उठवला नव्हता. तत्कालीन पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी या कामात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा अहवाल शासनास पाठवला होता. हा घोटाळा तत्कालीन मुख्य लेखापरिक्षक सुहास शिंदे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांच्या कार्यकाळात झाला आहे. मुख्यलेखापरिक्षक सुहास शिंदे यांनी त्यांच्या विभागाने उपस्थित केलेले आक्षेप हे संबंधित विभागाच्या जबाबदारीवर वगळले होते. त्यामुळे या भ्रष्टाचारात सुहास शिंदे व त्यांना पाठिशी घालणारे तत्कालीन पालिका आयुक्त रामास्वामी यांचा हातभार आहे.
सुर्वे यांनी याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन सदर कामाचे विशेष लेखापरिक्षण करण्याची मागणी केली होती. तत्कालीन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी याबाबत लेखापरिक्षण करण्याचे आदेश स्थानिक निधी लेखा परिक्षण समिती यांना दिले होते. परंतु, कक्ष अधिकारी नवनाथ वठ यांनी सदर प्रकरण विशेष लेखापरिक्षणासाठी पाठवण्यास अक्षम्य दिरंगाई केली. त्यानंतर स्थानिक निधी लेखा परिक्षण समितीने केलेल्या विशेष लेखापरिक्षण अहवालात सदर कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे नमुद केले आणि निविदा प्रक्रियेचे खापर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर फोडले. सदर अहवाल सादर होऊनही एकाही पालिका आयुक्तांनी एकाही पालिका अधिकाऱ्याला कोणतीही नोटीस आजतागायत बजावलेली नाही. याबाबत सुर्वे यांनी राज्याचे महालेखापाल यांच्याकडे तक्रार करुन सदर कामाचे पुर्नलेखापरिक्षण करण्याची मागणी केली. राज्याच्या महालेखापालांनी या कामाचे लेखापरिक्षण केले असता त्यांना पालिकेने संबंधित ठेकेदार बीव्हीजी इंडिया प्रा.लि. यांना 7 कोटी 20 लाख रुपये अतिरिक्त देण्यात आल्याचे अहवालात नमुद केले आहे. त्यामध्ये प्रशासकीय खर्च म्हणून 3.25 कोटी रुपये, केमिकल पुरवठ्यापोटी 3.47 कोटी तर सेवा शुल्कापोटी 47.27 लक्ष रुपयांचा समावेश आहे.
- एन. रामास्वामींची भूमिका संशयास्पद
बीव्हीजीचे काम समाधानकारक नसल्याने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर काम 17 मार्च 2017 रोजी रद्द केले. पुढील नियोजन होईपर्यंत काम सुरु ठेवण्याची शिफारस सदर आदेशात केली होती. परंतु नंतर आलेल्या पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी कोणतीही निविदा प्रक्रीया न राबविता हे काम तसेच सुरू ठेवले. त्यामुळे मिस्टर क्लिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामस्वामींची भूमिका संशयास्पद आहे.
गेली आठ वर्षे सदर प्रकरणाचा पाठपुरावा झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे. परंतु, संबंधित रक्कम वसूलीसाठी कोणतीही कारवाई पालिकेने आजतागायत न करता पालिकेतील अधिकाऱ्यांनी बीव्हीजी इंडिया प्रा.लि. यांचे अनेक कामातील सुरक्षा अनामत रक्कम परत केली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्य लेखापरिक्षक सुहास शिंदे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी सुरुवातीपासून केला असून त्यास स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्या आयुक्त एन. रामास्वामी यांनी केला होता. याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी व रक्कम वसूलीसाठी जनहित याचिका दाखल करु. - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे