Breaking News
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
रायगड : रायगड जिल्ह्यात पर्यटन वृद्धीच्या अनेक संधी आहेत. मात्र पर्यटन वाढीसाठी अधिक सेवा सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे आज राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा राज्यपाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना, शिवभोजन, मुख्यमंत्री सोलर पंप योजना, अमृत आहार, माझी कन्या भाग्यश्री, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कातकरी अभियान, आयुष्यमान भारत या सह केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, बेटी बचाव-बेटी पढाव, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, अमृत योजना, ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास योजना, मनरेगा, आदी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी एकाच वेळी किमान 4 ते 5 हेलिकॉप्टर उतरले पाहिजेत अशा सुविधा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशभरातील पर्यटक तेथे भेट देवू शकतील. रायगड जिल्ह्याला सागरी, डोंगरी आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याचा उपयोग पर्यटन वृद्धीसाठी होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पर्यटनाच्या अधिक संधी आहेत. तेथे वाहतूक व्यवस्थेसोबतच अधिकाधिक अन्य सेवा सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासकीय निधीचा उपयोग शंभर टक्के झाल्यास अपेक्षित विकास होऊ शकतो असे ही राज्यपाल यांनी सांगितले. या आढावा बैठकीस विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai