डेंगूच्या साथीने नागरिक हैराण; आरोग्य केंद्रात हेळसांड
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 17
कोप्रोली पाणदिवें गावात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव
उरण ः कोप्रोली पाणदिवें गावात डेंग्यूची साथ मोठ्या झपाट्याने पसरत आहे. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्क्रिय कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर सेवा न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
ऐन उन्हाळ्यात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उरणच्या कोप्रोली-पाणदिवे गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. सध्याच्या घडीला डेंग्यूचे 20 रुग्ण आढळले असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावागावात औषध फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, साथीच्या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अलर्ट राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पण डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना नसल्याने रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे नागरिकांचा म्हणणे आहे. डेंग्यूची साथ पसरल्यानंतर खडबडून जागे झालेल्या उरण आरोग्य अधिकारी व पथकाने संपूर्ण पाणदिवे गावाची तपासणी केली. या तपासणीत पाणदिवे गावात पाणी साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील यांनी दिली.
आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर सेवा न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, अनेक वेळा आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसतात. त्यामुळे लहानसहान आजारांसाठीही रुग्णांना उरण किंवा पनवेल येथील मोठ्या रुग्णालयात जावे लागते. आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव, अपुरी साधनसामग्री आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. प्राथमिक केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे किरकोळ आजारांसाठीही रुग्णांना उरण, नवी मुंबई, पनवेल येथील रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती तसेच लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
काही ग्रामस्थांनी सांगितले की, तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. दरम्यान, नागरिकांनी संबंधित आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, तसेच आवश्यक औषधे व सुविधा तत्काळ उपलब्ध कराव्यात, डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.
- 27 पदे रिक्त
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी 3, महिला आरोग्य परिचारिका 2, आरोग्य सेविका 26, शिपाई 2 आदी 33 पदे मंजूर आहेत. यामध्ये आवश्यकता असलेल्या तीन सुरक्षारक्षकांचा समावेश नाही. यापैकी वैद्यकीय अधिकारी 2, महिला आरोग्य परिचारिका 1, आरोग्य सेविका 23, शिपाई 2 अशी 27 पदे रिक्त आहेत.
रुग्ण तपासणीचा भार केवळ तीन आरोग्य सेविकांवर असल्यामुळे येथील आरोग्य सेवेचा परिणाम रुग्णावर होत आहे. रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai