यकृताच्या छुप्या शत्रूला वेळीच ओळखा
- by Aajchi Navi Mumbai
- May 06, 2026
- 21
जीवनशैलीत बदल आणि नियमित तपासणीने करा बचाव
दरवर्षी जगभरातील लाखो लोक आपल्या शरीरात एक टाइम बॉम्ब घेऊन फिरत असतात आणि त्यांना स्वतःला त्याची पुसटशी कल्पनाही नसते तो म्हणजे आजारामुळे हळूहळू निकामी होत जाणारे यकृत किंवा लिव्हर. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि त्यात अधिक घातक प्रकार नॅश, हे आजार सध्या जगभरात वेगाने पसरत आहेत. मात्र, दुर्दैवाची गोष्ट अशी की, बहुतेक लोकांना हा आजार समजून येतो, तोपर्यंत त्यांच्या यकृताचे भरून येऊ न शकणारे नुकसान झालेले असते.
यकृतामध्ये पेन रिसेप्टर्स म्हणजे वेदना ओळखणाऱ्या पेशी नसतात. त्यामुळे ते निमुटपणे त्रास सोसत राहते आणि रुग्णही बेसावध राहतो. जोपर्यंत लक्षणे दिसायला लागतात, तोपर्यंत हा आजार सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर म्हणजे यकृत निकामी होण्यासारख्या गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो. म्हणूनच फॅटी लिव्हरला यकृताचा सायलेंट किलर अर्थात गुपचूप घात करणारा शत्रू म्हटले जाते.
जास्त धोका कोणाला असतो?
- जगातील सुमारे 25% लोक फॅटी लिव्हरमुळे प्रभावित आहेत. खालील घटक या आजाराचा धोका वाढवतात:
- वजन जास्त असलेल्या व्यक्ती, विशेषतः पोटावर चरबी वाढलेली असेल तर.
- टाईप 2 मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्ती.
- ज्यांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढलेली आहे.
- बैठी जीवनशैली, शारीरिक हालचाल खूप कमी किंवा व्यायामाचा अभाव असलेल्या व्यक्ती.
- चुकीचा आहार म्हणजे भरपूर प्रमाणात साखर, मैद्याचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अति प्रमाणात खाणारे लोक.
- ज्यांच्या कुटुंबात आधी कोणाला यकृताचे आजार झालेले आहेत अशा व्यक्ती.
जीवनशैलीतील बदलांची किमया
- सर्वात मोठी जमेची बाजू ही आहे की, यकृत हा मानवी शरीरातील सर्वात वेगाने स्वतःला दुरुस्त करू शकणारा अवयव आहे. जीवनशैलीत केलेले छोटे बदलही यकृताचे सुरुवातीचे नुकसान पूर्णपणे भरून काढू शकतात:
- आहार: तुमच्या आहारात भाज्या, कडधान्ये, प्रथिने आणि सकस चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा. साखरयुक्त पेये आणि पॅकेटमधील प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे बंद करा. शरीराचे वजन फक्त 5 ते 10 टक्क्यांनी कमी केल्यास यकृतातील चरबी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
- व्यायाम: आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम कराजसे की वेगाने चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे. यामुळे यकृतातील सूज कमी होते आणि यकृताचे कार्य सुधारते.
- दारूचे व्यसन: जरी फॅटी लिव्हरचा हा प्रकार दारूमुळे होत नसला, तरी कोणत्याही प्रकारचे मद्यपान यकृताचे आरोग्य अधिक बिघडवते. त्यामुळे दारू पूर्णपणे बंद करणे किंवा ती टाळणे हे यकृताच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
- वेळीच केलेली तपासणी: यकृताच्या आरोग्याची जीवनरेखा
- यकृताच्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी वेळीच निदान हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वीच फॅटी लिव्हर किंवा लिव्हर फायब्रोसिसचा शोध घेण्यासाठी रक्ताची तपासणी, पोटाची सोनोग्राफी किंवा फायब्रोस्कॅन या चाचण्या अत्यंत उपयुक्त ठरतात.
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांची चयापचय शक्ती मंदावली आहे किंवा ज्यांचे वजन जास्त आहे, अशा जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या वार्षिक आरोग्य तपासणीमध्ये यकृत तपासणीचा समावेश आवर्जून करावा. फॅटी लिव्हर जर सुरुवातीच्या टप्प्यावर असेल, तर ते पूर्णपणे बरे होऊ शकते. मात्र, हाच आजार जर नॅश सारख्या गंभीर टप्प्यावर पोहोचला, तर त्यामुळे सिरोसिस, यकृताचा कर्करोग किंवा यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
डॉ सोनाली गौतम, कन्सल्टन्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai