सराईत गुन्हेगारांना अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 29
11 गुन्ह्यांची उकल; 11.67 लाखांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबई : घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या मालिकेतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक करत नवी मुंबई गुन्हे शाखेने 11 गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी असा एकूण 11.67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.
कोपरखैरणे येथील सेक्टर 12 बी मधील एका गृहनिर्माण संस्थेत 7 जून रोजी घरफोडीची घटना घडली होती. प्रमोद वादळ यांच्या घराचा दरवाजा उचकटून 15.55 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, तसेच शेजारी राहणारे संजय नागरे यांच्या घरातील 40 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या कक्ष-1 पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने दोन संशयितांची ओळख पटविण्यात आली. दोघेही सराईत गुन्हेगार असून कायम वास्तव्य बदलत मिरा-भाईंदर, चेंबूर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध लॉज व डॉरमेटरीमध्ये राहत असल्याची माहिती तपासात समोर आली.
सलग 16 दिवस आरोपींचा मागोवा घेतल्यानंतर गुन्हे शाखेने 23 जून रोजी कोपरखैरणे परिसरातून युसुफ रशिद शेख उर्फ दीपक उर्फ राहुल (वय 42) आणि नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर (वय 32) यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी कोपरखैरणे, पनवेल तालुका, बदलापूर, वाशिंद आणि नारपोली परिसरातील नऊ घरफोड्यांची, तसेच नौशादने अन्य साथीदारासह खारघर आणि बाजारपेठ परिसरातील दोन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या तपासात कोपरखैरणे येथील घरफोडीतील 9.47 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, अन्य एका गुन्ह्यातील 84 हजार 700 रुपयांची सोन्याची साखळी तसेच दोन दुचाकी असा एकूण 11 लाख 67 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या कक्ष-1 पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा सातत्याने पाठलाग करून ही कारवाई यशस्वी केली. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai