माणगाव बाह्यवळणाचे 75 टक्के काम पुर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2026
- 19
गणेशोत्सवापूर्वी मार्ग वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उर्वरित कामे, माणगाव व इंदापूर बाह्यवळण, चिपळूण उड्डाणपूल, संगमेश्वर येथील पूल तसेच कोकणातील अन्य महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून ही कामे वेगाने सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडकळ बाह्यवळणाचे काम पूर्ण झाले असून माणगाव व इंदापूर बाह्यवळणाच्या उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. माणगाव बाह्यवळणाच्या साडेसात किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील रेल्वे उड्डाणपुलाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून एक बाजू 31 ऑगस्ट 2026 पूर्वी, गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातील दोन्ही मोठ्या पुलांचे 90 टक्के, तर व्हायडक्टचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून ही कामे 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण होतील.
इंदापूर बाह्यवळणाच्या साडेतीन किलोमीटर प्रकल्पातील दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांची प्रत्येकी 40 टक्के कामे पूर्ण झाली असून ती 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. राज्यातील पनवेल ते झाराप या 449 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गापैकी 417 किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण येथील उड्डाणपूल अंतिम टप्प्यात असून तो ऑगस्ट 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पूल व त्याचे पोहोच मार्गही ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले. परशुराम घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी व्हायडक्ट उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून त्यास लवकरच मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भायखळ्यातील डॉकयार्ड रोड परिसरासह मुंबईतील दरडप्रवण भागांतील संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून लवकरच आवश्यक कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai