सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांच्या कार्यवाहीचा आढावा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 25
नवी मुंबई ः महानगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका सर्वसाधारण सभांना सुरूवात झाली असून या सभांमध्ये मंजूर झालेल्या विविध ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठक आयोजित करीत घेतला. आरोग्य, शिक्षण विषयक ठरावांवर जलद कार्यवाही करण्याचे तसेच इतर ठरावांच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी प्रशासनास दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेची प्रथम महासभा 20 फेब्रुवारी 2026 रोजी झाल्यापासून दरमहा होणाऱ्या महासभांमध्ये विविध नागरी सुविधा, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि आर्थिक नियोजनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, 20 फेब्रुवारीपासून आजतागायत महासभेत मंजूर झालेल्या सर्व ठरावांवरील प्रशासकीय कार्यवाही आणि त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत प्रत्येक ठरावावर सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या थेट हिताशी संबंधित आरोग्य व शिक्षण विषयक ठरावांची अंमलबजावणी प्राधान्याने आणि अत्यंत जलद गतीने करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, इतर सर्व विकासकामांना गती देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. महासभेत मंजूर झालेले लोककल्याणकारी निर्णय आणि शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर कोणताही विलंब न होता प्रभावीपणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी प्रशासनाने अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, सुरज पाटील, रामचंद्र घरत, अंजनी भोईर, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai