नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 22
पहिल्या टप्प्यात अबु धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे
उरण ः अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली. 15 जुलैला एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पहाटे 2:55 वाजता संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीसाठी रवाना झाले. तर अबू धाबीहून आलेले विमान सकाळी 10.20 वाजता विमानतळावर उतरले. या विमानाचे पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूटद्वारे भव्य स्वागत करण्यात आले. या आगमनासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवेची अधिकृत सुरुवात झाली असून, भारताच्या जागतिक हवाई संपर्काला नवे बळ मिळणार आहे.
25 डिसेंबर 2025 रोजी देशांतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या 200 दिवसांतच विमानतळाने आंतरराष्ट्रीय सेवेचा टप्पा गाठला आहे. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीसाठी थेट आणि अधिक सोयीस्कर हवाई संपर्क उपलब्ध झाला आहे. तसेच, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जच्या अखत्यारीतील सर्व विमानतळ आता आंतरराष्ट्रीय सेवांशी जोडले गेले आहेत. बुधवारी नवी मुंबई विमानतळाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली. एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पहाटे 2:55 वाजता संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीसाठी रवाना झाले. हे विमान सुमारे अडीच तासांच्या प्रवासानंतर संयुक्त अरब अमिरातीतील अबूधाबी विमानतळावर पोहोचले. नवी मुंबई-अबूधाबी ही सेवा आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार असून, मुंबई महानगर प्रदेश आणि यूएई दरम्यान थेट हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे. हे नवी मुंबई विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण नोंदवले गेले. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशाची आंतरराष्ट्रीय संपर्कक्षमता वाढणार असून विमानतळाला जागतिक प्रवेशद्वाराचे स्वरूप मिळणार आहे.
अवघ्या सात महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने 46 देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित करत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावर दररोज सुमारे 150 हवाई वाहतूक हालचाली होत आहेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाद्वारे नाशवंत वस्तूंच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय निर्यात मालवाहतुकीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत अधिक वेगाने पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार असून, विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेलाही नवी दिशा मिळणार आहे. अबू धाबी हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिला आंतरराष्ट्रीय मार्ग असून, लवकरच आणखी अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्ये या जाळ्यात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतूक क्षमतेला बळ मिळण्यासह भारताच्या आंतरराष्ट्रीय संपर्क, व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai