विमानतळ बाधितांचे प्रश्न मार्गी लावण्याचे सिडकोचे आश्वासन
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 20
मागण्यांवर सकारात्मक चर्चा; निर्णयांची अंमलबजावणी न झाल्यास 7 डिसेंबरपासून सिडको भवनात गेटबंद आंदोलन
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर बुधवारी (25 नोव्हेंबर) सिडको भवनात आंदोलनकर्ते आणि सिडको अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मात्र, बैठकीत झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास 7 डिसेंबर 2026 पासून पुन्हा सिडको भवन येथे गेटबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनाचे संघटक किरण केणी यांनी दिला आहे.
विमानतळ प्रकल्पबाधित भूमिपुत्रांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने 7 डिसेंबर रोजी सिडको भवन येथे गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हाधिकारी तथा भूमी व भूमापन अधिकारी (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रतिभा पुदलवाड यांनी बुधवारी त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रकल्पबाधित कुटुंबांचे प्रलंबित घरभाडे भत्ते आणि प्रोत्साहन भत्ते तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील कुटुंबांवर सिडकोने केलेल्या तोडक कारवाईनंतर त्यांना नव्याने घरे बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच शून्य पात्रतेच्या कारणास्तव नाकारण्यात आलेली, मात्र सुबोध कुमार आणि सुधीर ठाकरे समितीने नंतर मंजूर केलेली घरे यांची लॉटरी तातडीने काढावी, अशी मागणी करण्यात आली. उर्वरित शून्य पात्रतेतील घरांची कागदपत्रे तपासून पात्रता मंजूर करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली.
वाघिवली आणि इतर गावांतील घरे तोडल्यानंतरही भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरभाडे भत्ता सुरू ठेवावा, तसेच वाघिवली आणि गणेशपुरी येथील पारंपरिक मच्छीमार प्रकल्पबाधितांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, असे मुद्देही बैठकीत मांडण्यात आले. या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या बैठकीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, संघटक किरण केणी, अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हा सेक्रेटरी संजय ठाकूर, महिला प्रतिनिधी चांगुणा डाकी, प्रवीण मुठ्ठेनवार, संतोष कट्टिमणी आणि अंकुश केणी आदी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही, तर 7 डिसेंबर रोजी नियोजित गेटबंद आंदोलन केले जाईल, असा ठाम इशारा किरण केणी यांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai