वाशी रेल्वे पोलिसांचे जीवन रक्षा अभियान
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 20
नवी मुंबई : रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघाती मृत्यू आणि गंभीर जखमींच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाशी रेल्वे पोलिसांनी जीवन रक्षा अभियान अंतर्गत वाशी रेल्वे स्थानकात अनोखी आणि प्रभावी जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे यमदेवाची प्रतिकात्मक व्यक्तिरेखा साकारुन प्रवाशांना जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
22 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत वाशी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1-2 आणि सीएसएमटी दिशेकडील परिसरात सदर मोहीम पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक पारासुर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक जवंजाळ, मोगल, गुजर यांच्यासह वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील 25 पोलीस अंमलदार, होमगार्ड, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे अधिकारी आणि कर्मचारी तसेच एमएसएफ कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जनजागृती अधिक परिणामकारक करण्यासाठी पोलीस अंमलदाराने यमदेवाची वेशभूषा परिधान करुन प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडण्याचे धोके समजावून सांगितले. या अनोख्या सादरीकरणामुळे प्रवाशांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे प्रवाशांमध्ये स्वतःच्या सुरक्षेसंबधात जागृती निर्माण झाली. या मोहिमेदरम्यान रेल्वे रुळ ओलांडू नये, अवाजवी धाडस टाळावे, वैध तिकीट घेऊन प्रवास करावा, रेल्वे प्रवासात स्टंटबाजी करु नये, संशयास्पद किंवा बेवारस वस्तू दिसल्यास त्वरित रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, तसेच अडचण आल्यास जीआरपी हेल्पलाईन 1512 वर संपर्क साधावा, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
घोषणाबाजी, प्रत्यक्ष समुपदेशन, मानव साखळी आणि यमदेवाच्या प्रतिकात्मक सहभागातून सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामुळे सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी केला. अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळ न ओलांडण्याचा संकल्प व्यक्त करत रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रेल्वे पोलिसांबद्दल विश्वास आणि सहकार्याची भावना अधिक दृढ करण्यासही या मोहिमेला यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai