सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती आणि महिला सुरक्षेचे विद्यार्थ्यांना धडे
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 20
नेरूळ पोलिसांचा जनजागृती उपक्रम
नवी मुंबई : वाढत्या सायबर गुन्हेगारी, अमली पदार्थांचे व्यसन आणि महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नेरूळ पोलीस ठाण्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सायबर जनजागृती, नशामुक्ती आणि महिला सुरक्षा अभियानाअंतर्गत सोमवारी नेरूळ पोलीस ठाण्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आल होते.
या कार्यक्रमात नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लाड आणि पोलिस उपनिरीक्षक कीर्ती चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. नागरिकांनी जागृत आणि सावध राहिले तरच सुरक्षित जीवन जगता येईल, असे सांगत पोलिस निरीक्षक संजय लाड यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अमली पदार्थांच्या व्यसनाचे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना अशा प्रलोभनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंट्स, फोटो आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर कशा प्रकारे होऊ शकतो, याची उदाहरणांसह माहिती दिली.
पोलिस उपनिरीक्षक कीर्ती चव्हाण यांनी महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी, निर्भया पथकाचे कार्य, तसेच गुड टच आणि बॅड टच याविषयी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले. कोणत्याही संशयास्पद किंवा अनुचित प्रकाराबाबत तात्काळ विश्वासू व्यक्ती किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात नवी मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त दत्तात्रय नागरे, शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दिलीप आमले आणि पोलीस अमलदार जावेद बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप आमले यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात घडणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले. तसेच चुकीच्या मार्गाला बळी न पडता खेळ, व्यायाम आणि सकारात्मक छंद जोपासून व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्हे आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे तसेच महिला सुरक्षेविषयी आत्मविश्वास वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध विषयांवर प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai