धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आज निर्णय?
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 18
सरकार-आंदोलकांमध्ये दोन तास चर्चा; तीन पैकी दोन मागण्या मान्य
पेपरफुटीविरोधी कायदा कडक करणार ; संघटित गुन्ह्यांसाठी 10 वर्षांच्या कारावासाची तरतूद प्रस्तावित
दिल्ली : राजधानी दिल्लीत शुक्रवारी पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींशी नवी दिल्लीतील विठ्ठलभाई पटेल हाऊस येथे जवळपास दोन तास चर्चा केली. या बैठकीत आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने शनिवारी दुपारपर्यंतचा अवधी मागितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
देशभरात नीट पेपरफुटीवरुन विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत असून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने उभारलेल्या आंदोलनात हे सर्वजण सहभागी होत आहेत. एकीकडे दिल्लीतील आंदोलन मोठं होत असून दुसरीकडे सरकारकडून आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलकांना केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सौरव दास व आशुतोष रांका यांनी सरकारच्या दोन महत्त्वाच्या अटी मान्य केल्यानंतरच या चर्चेत सहभागी होण्यास संमती दर्शवली. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. अलीकडेच झालेल्या परीक्षांमधील गोंधळ/गटबाजीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती भरपाई दिली जाईल. या दोन अटींवर सरकारने सहमती दर्शवली असली, तरी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आपली मुख्य मागणी सीजेपीने अजूनही लावून धरली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, आंदोलनकर्त्यांशी झालेल्या भेटीदरम्यान आम्ही त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे. आमची त्यांच्यासोबतची बैठक जवळपास 2 तास चालली. त्यांच्या 3 मुख्य मागण्या होत्या आणि परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी त्यांच्याकडून 5 सूचना देण्यात आल्या होत्या. नड्डा यांनी पुढे सांगितले की, आम्ही त्यांना स्पष्ट केले आहे की उद्या दुपारी आम्ही त्यांची पुन्हा भेट घेऊ आणि सरकारमध्ये यावर काय चर्चा झाली, याची संपूर्ण माहिती त्यांना देऊ.
दुसरीकडे, नीट परीक्षांमधील गोंधळ आणि देशातील स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण प्रणालीत सुधारणा करण्याबाबत केंद्र सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले 26 दिवसांचे आमरण उपोषण मागे घेतले आहे. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी आपले 26 दिवस चाललेले हे उपोषण अधिकृतपणे मागे घेतले. तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी म्हटलं.
- पेपर फुटीसंदर्भात नवीन कायदा मंजूर
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार गंभीर बनले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: ट्विट करत नीट पेपरफुटीप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, पेपर फुटीबाबत कडक कायदा आणण्यात येईल, असेही मोदींनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेटमध्ये पेपर फुटीसंदर्भात नव्याने कायदा आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील कॅबिनेटमध्ये पेपर फुटीसंदर्भातील कायदा आणखी कडक करण्यासाठी विधेयक आणण्यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, पुढील आठवड्यातच हे विधेयक संसदेत संमत होणार आहे.
नव्या विधेयकातील प्रमुख तरतुदी
- पेपरफुटीशी संबंधित संघटित गुन्ह्यांसाठी 10 वर्षांपर्यंत कारावास.
- दोषींवर 10 कोटी रुपयांपर्यंत दंड.
- प्रकरणांची फास्टट्रॅक न्यायालयात सुनावणी.
- तीन महिन्यांत खटल्याचा निकाल देण्याची तरतूद.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai