कोकणकरांसाठी 246 गणपती विशेष गाड्या
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 24
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेने तब्बल 246 गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 184 आरक्षित गणपती विशेष गाड्या तसेच 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांमुळे नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, आरक्षण न मिळालेल्या हजारो गणेशभक्तांना कोकणात जाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होत असून, नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील आरक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), पुणे आणि दिवा येथून सावंतवाडी रोड, रत्नागिरी, मडगाव, खेड आणि चिपळूणसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये सीएसएमटीहून 98, एलटीटीहून 76, पुण्याहून 10, तर दिवा-खेड आणि दिवा-चिपळूण मार्गावर 62 अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे परिसरातून लाखो चाकरमानी आणि गणेशभक्त कोकणात रवाना होतात. त्यामुळे नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील आरक्षण अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होते. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष गाड्यांच्या घोषणेची प्रवासी आतुरतेने वाट पाहत होते. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे हजारो गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीएसएमटीहून सर्वाधिक सेवा
सीएसएमटी-सावंतवाडी रोड मार्गावर दोन दैनिक विशेष गाड्या चालविण्यात येणार असून, त्यामध्ये अनुक्रमे 32 आणि 34 अशा एकूण 66 फेऱ्या असतील. याशिवाय सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी मार्गावर 32 विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
एलटीटीहूनही मोठी सोय
एलटीटी-सावंतवाडी रोड मार्गावर दैनिक, द्वि-साप्ताहिक आणि साप्ताहिक अशा तीन प्रकारच्या विशेष गाड्या धावणार आहेत. या मार्गावर 34 दैनिक, 8 द्वि-साप्ताहिक आणि 4 साप्ताहिक, अशा एकूण 46 फेऱ्या असतील. तसेच एलटीटी-रत्नागिरी-एलटीटी मार्गावर आठवड्यातील पाच दिवस 22 विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गोवा आणि दक्षिण कोकणातील प्रवाशांसाठी एलटीटी-मडगाव-एलटीटी मार्गावर 4 पूर्ण वातानुकूलित विशेष गाड्या आणि 4 मिश्र रचनेच्या विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळीसह प्रमुख स्थानकांवर थांबा असेल.
पुणे, दिव्यातूनही सेवा
पुणे विभागातूनही गणेशभक्तांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे-रत्नागिरी मार्गावर 4 वातानुकूलित विशेष आणि 6 साप्ताहिक विशेष, अशा 10 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्या चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबतील.
कोकणातील स्थानिक प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दिवा-खेड मार्गावर 32 अनारक्षित मेमू विशेष, तर दिवा-चिपळूण मार्गावर 30 अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील मधल्या स्थानकांवरील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
1 ऑगस्टपासून आरक्षण
मध्य रेल्वेने आरक्षित विशेष गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 1 ऑगस्टपासून गाडी क्रमांक 01153, 01445, 01167 आणि 01447, 2 ऑगस्टपासून 01165 आणि 01185, तर 3 ऑगस्टपासून 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131 या गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय टळण्यास मदत होणार आहे. विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा असून, प्रवाशांचा प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन आवश्यक वाटल्यास आणखी विशेष गाड्या चालविण्याबाबत मध्य रेल्वेकडून विचार केला जाऊ शकतो.
अशा आहेत गणपती विशेष गाड्या- सीएसएमटी - सावंतवाडी रोड : 66 फेऱ्या- सीएसएमटी - रत्नागिरी : 32 फेऱ्या- एलटीटी - सावंतवाडी रोड : 46 फेऱ्या- एलटीटी - रत्नागिरी : 22 फेऱ्या- एलटीटी - मडगाव : 8 फेऱ्या- पुणे - रत्नागिरी : 10 फेऱ्या- दिवा - खेड मेमू : 32 फेऱ्या- दिवा - चिपळूण मेमू : 30 फेऱ्याएकूण विशेष गाड्या : 246
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai