महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 26
मुंबई वॉटर मेट्रो, दिघी ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर, रेडिओ क्लब, मांडवा जेट्टीसह विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना येणार गती
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, जलवाहतूक व्यवस्था सक्षम करणे, जहाजबांधणी उद्योगाला चालना देणे, बंदरे व जेट्टींच्या सुविधा आधुनिक करणे तसेच किनारी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. मंडळाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकासही संचालक मंडळाने मान्यता दिली.
मंडळाच्या मालमत्ता आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करून महसूलवाढीचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागांचा नियोजनबद्ध वापर, भाडेतत्त्वावरील सुविधा आणि इतर महसूलवर्धक उपक्रमांमधून मंडळाची आर्थिक क्षमता मजबूत कराव्यात. सागरी मंडळाला आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. महसूल वाढीसाठी नवीन योजनांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. जलमार्गाचा अधिकाधिक वापर करून मुंबई आणि एमएमआरमधील वाहतुकीला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. निविदा प्रक्रिया नियमबद्ध, पारदर्शक आणि स्पर्धात्मक पद्धतीने राबविण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी केल्या.
रायगड जिल्ह्यातील मांडवा पॅसेंजर जेट्टीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रवाशांची सुरक्षितता आणि वाढती प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन जेट्टीची कामे व्यवस्थित, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील सतकोंडी येथे गोवा शिपयार्ड प्रकल्पासाठी आवश्यक जोडरस्ता उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीच्या जमिनींचा प्रभावी वापर करून स्टॉल भाडेतत्त्वावर देण्यास तसेच स्टॉल उभारणीस मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या विविध प्रलंबित व प्रस्तावित कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. कामांना अनावश्यक विलंब होऊ नये, मंजूर प्रकल्पांची निविदा व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि प्रत्यक्ष कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. जलवाहतूक, जहाजबांधणी, बंदर विकास आणि किनारी पर्यटनाला एकत्रित चालना देणाऱ्या या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
दिघी येथे ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर
रायगड जिल्ह्यातील दिघी येथे ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. 20 ऑगस्टपर्यंत निविदा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जहाजबांधणी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देणे, उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणे या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
बांद्रा बँडस्टॅन्डचा सर्वांगीण विकास
मुंबईतील बांद्रा बँडस्टॅन्डच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामास मंजुरी देण्यात आली. याठिकाणी नागरिक व पर्यटकांसाठी उद्यान, बेंचेस, ॲम्पिथिएटर आणि आवश्यक सार्वजनिक सुविधा विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सुविधा आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली. किनारी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बांद्रा बँडस्टॅन्डचा परिसर अधिक सुशोभित, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्याच्या दृष्टीने या कामांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai