अवैध गौण खनिज उत्खननाला बसणार चाप
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 20
महाखनिज-2 पोर्टलवरून खाणमाफियांवर नजर
मुंबई : राज्य सरकार आणि महसूल खात्याची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे डोंगर पोखरणाऱ्या आणि माती, मुरूम, खडी यांसारख्या गौण खनिजांची चोरी करणाऱ्या माफियांविरोधात राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. गौण खनिज चोरांची पूर्ण कुंडली मांडण्यासाठी आणि त्यांच्यावर 24 तास बारीक लक्ष ठेवण्यासाठी सरकारने महाखनिज-2 या नव्या संगणकीय प्रणालीची उभारणी केली आहे. कोकण विभागीय आयुक्त आयएएस रूबल अग्रवाल यांची या प्रकल्पाच्या नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्या संपूर्ण राजयातील उत्खनन प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
यापूर्वी राबवलेल्या बहुतांश योजना कागदावरच राहिल्याने भू-माफियांनी सरकारचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडवला. हे रोखण्यासाठी महाखनिज-2 अंतर्गत कडक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. या यंत्रणेचे मुख्य कंट्रोल रूम नवी मुंबईतील कोकण भवन येथे उभारण्यात आले आहे. येथून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील महसूल विभाग थेट जोडले जातील.
प्रत्यक्ष उत्खननाच्या ठिकाणी हाय-टेक कॅमेरे, डिजिटल ट्रॅकिंग यंत्रणा आणि पोलिसांचा पहारा असणार आहे. कोणत्या खाणीतून किती खनिज काढले जात आहे, दिलेल्या परवान्याची मर्यादा किती आहे आणि प्रत्यक्ष भरलेली रॉयल्टी (शुल्क) किती, याचा डिजिटल हिशोब या पोर्टलवर राहील. परवान्यापेक्षा जास्त उत्खनन करणे किंवा विनापरवाना बेकायदेशीरपणे उत्खनन करून महसूल बुडवणाऱ्या माफियांना या प्रणालीमुळे मोठा दणका बसणार आहे. या पारदर्शक यंत्रणेमुळे राज्य सरकारला वर्षाला तब्बल 5 हजार 875 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या धडक कारवाईबाबत बोलताना कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त व नोडल ऑफिसर रूबल अग्रवाल म्हणाल्या, “गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन करून सरकारची दिशाभूल करणाऱ्यांवर आता कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमधील दोषींना कोणीही पाठीशी घालणार नाही आणि दंड आकारताना कोणतीही हायगय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रसंगी थेट काळ्या यादीत टाकले जाईल.- रूबल अग्रवाल, विभागीय कोकण आयुक्त
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai