सिम्प्लेक्स रहिवाशांचा क्लस्टरसाठी एल्गार
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 21
भाजपचा ‘शहर वाचवा’, रहिवाशांचा ‘घर वाचवा’चा नारा
नवी मुंबई : घणसोली येथील सिम्प्लेक्स हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या क्लस्टर पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला भाजपने क्लस्टर धोरणामुळे शहराच्या नियोजनावर आणि पायाभूत सुविधांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे, तर दुसऱ्या बाजूला सिम्प्लेक्समधील हजारो रहिवासी सुरक्षित घरांसाठी क्लस्टर पुनर्विकासाची मागणी करत आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
माथाडी कामगारांसाठी सिडकोने उभारलेल्या सिम्प्लेक्स हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये सुमारे 3,500 घरे असून जवळपास 16 हजार रहिवासी वास्तव्यास आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. इमारती जुन्या झाल्याने भिंती व खांबांना तडे, छताचे प्लास्टर कोसळणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्याचा दावा रहिवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षित आणि कायमस्वरूपी घरांसाठी क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी 14 जुलै 2026 रोजी सिम्प्लेक्स कॉम्प्लेक्सच्या समूह विकास योजनेबाबत अधिसूचना जारी केल्यानंतर हा विषय महासभेत आला. सभागृहनेते सागर नाईक यांनी क्लस्टर योजनेच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती किंवा संस्था नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर महासभेत दोन दिवस वादळी चर्चा झाली.
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी क्लस्टर योजनेमुळे नवी मुंबईतील पायाभूत सुविधांवर ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली. वाढीव एफएसआयमुळे वाहतूक, पाणीपुरवठा, रस्ते आणि पार्किंगवर अतिरिक्त भार पडू शकतो, असा दावा करण्यात आला. त्यामुळे क्लस्टरऐवजी पुनर्विकासाच्या अन्य पर्यायांचा अभ्यास करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका सत्ताधारी नगरसेवकांनी मांडली. याउलट शिवसेनेच्या नगरसेवकांनी सिम्प्लेक्समधील रहिवाशांच्या मागणीचा विचार करून क्लस्टर पुनर्विकासाला मंजुरी देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे महासभेतील चर्चेला राजकीय रंग चढला.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनीही क्लस्टर पुनर्विकास धोरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. वाशी येथे झालेल्या सभेत त्यांनी 30 वर्षे पूर्ण न झालेल्या आणि धोकादायक नसलेल्या इमारतींनाही क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकासाच्या कक्षेत आणण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिनदिक्कत एफएसआय वाढविल्यास नवी मुंबईच्या नियोजित विकासाला धक्का बसू शकतो, तसेच रस्ते, पाणी आणि पार्किंगसारख्या सुविधांवर ताण वाढू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. या धोरणाला आपण मंत्रिमंडळातही विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.
महासभेत बहुमताने क्लस्टरचा प्रस्ताव स्थगित ठेवून स्वयं पुनर्विकासाच्या पर्यायाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामुळे सिम्प्लेक्समधील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.“आम्हाला राजकारण नको, सुरक्षित घर हवे,” अशी भूमिका घेत रहिवाशांनी महापालिका मुख्यालयावर धडक देत आंदोलन केले. अनेक वर्षांपासून पुनर्विकासाची मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने रहिवाशांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. जो पर्यंत क्लस्टर पुनर्विकास लागू करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका रहिवाश्यांनी घेतली आहे.
एकीकडे भाजपकडून ‘शहर वाचवा’चा इशारा दिला जात असताना, दुसरीकडे सिम्प्लेक्समधील रहिवाशांकडून ‘घर वाचवा’ चा संघर्ष सुरू झाला आहे. यामुळे सिम्प्लेक्स क्लस्टरचा प्रश्न आता केवळ पुनर्विकासापुरता मर्यादित न राहता नवी मुंबईतील आगामी राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. यावर आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
- अलबेला-नैवेद्य साठी आ. मंदाताई सरसावल्या
वाशीतील नैवेद्य आणि अलबेला या इमारतींवर कारवाई होऊ नये म्हणून आ. मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन रहिवाशांना दिलासा दिला आहे. घर देता येत नसेल तर पाडण्याचे पाप करु नका अशी समज त्यांनी नाव न घेता नाईकांना दिली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता नैवेद्य आणि अलबेला इमारतीतील रहिवाशांना बेघर करू नका; अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी पालिका आयुक्तांना आढावा बैठकीत दिला. तसेच या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे मंदाताईंनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai