पोलिस वसाहतीतच भरदिवसा घरफोडी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 21
8.22 लाखांचा ऐवज लंपास; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पोलिस वसाहतीतच भरदिवसा घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका महिला पोलिस निरीक्षकाच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे लॉकर उचकटून 65 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण आणि 30 हजार रुपयांची रोकड असा एकूण 8 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सीबीडी सेक्टर-1 येथील पोलिस कॉलनीतील ई/3/04 या सदनिकेत संबंधित महिला पोलिस निरीक्षक वास्तव्यास आहेत. 19 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्या घराला कुलूप लावून कर्तव्यावर गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये जाऊन कपाटाचे लॉकर उचकटण्यात आले. त्यातील सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण आणि रोकड घेऊन चोरटे पसार झाले.रात्री साडेआठच्या सुमारास महिला पोलिस निरीक्षक घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपासचोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 18 ग्रॅम वजनाची सोन्याची मण्यांची माळ, 16 ग्रॅम वजनाची सोन्याची स्नेक डिझाईन चैन, 15 ग्रॅम वजनाची सोन्याची हस्तमुखी गोठ बांगडी, विविध प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातले दोन जोड, चांदीचे दोन पैजण आणि 30 हजार रुपयांच्या रोकडचा समावेश आहे.
सीबीडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(1), 331(4) आणि 305(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.पोलिस वसाहतीसारख्या सुरक्षित परिसरात पोलिस अधिकाऱ्याच्या घरावरच भरदिवसा चोरी झाल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिस वसाहतीतील रहिवाशांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai