5,35,214 मतदारांचे डिजिटलायझेशन पूर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 31
24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी
नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात गणनाप्रपत्रे संकलित करून त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. दोन्ही मतदारसंघातील 5,35,214 मदारांच्या गणना पत्रांचे डिजिटलायझेशन पुर्ण झाले आहे. आता 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.
30 जून ते 17 ऑगस्ट या कालावधीत मतदारांकडून गणनाप्रपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अर्जांचे डिजिटलायझेशन करण्यात आले. 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघात एकूण 4,97,380 मतदारांपैकी 2,78,228 गणनाप्रपत्रे प्राप्त झाली असून त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. तर 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघात 4,22,317 मतदारांपैकी 2,56,986 गणनाप्रपत्रे प्राप्त झाली असून त्यांचेही डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यामध्ये आपले नाव आहे की नाही, हे तपासता येणार आहे. यासाठी नागरिकांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर ऑनलाइन मतदार यादी तपासावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा एखाद्या नावाच्या समावेशाबाबत हरकत असल्यास 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येणार असून 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता आणि अद्ययावतपणा सुनिश्चित करण्यासाठी हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पात्र व्यक्ती मतदार यादीतून वगळली जाऊ नये आणि अपात्र व्यक्तीचा समावेश होऊ नये, या उद्देशाने प्रक्रिया राबविण्यात येत आहे.एसआयआर कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai