दिवाळे, सारसोळेत पारंपरिक उत्साहात नारळी पौर्णिमा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 22
नवी मुंबई : आगरी-कोळी संस्कृतीचा गौरव आणि भूमीपुत्रांच्या श्रद्धेचा उत्सव असलेल्या नारळी पौर्णिमेचा सण नवी मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळे आणि सारसोळे गावात पारंपरिक पद्धतीने हा नारळी पौर्णिमेचा विशेष उत्सव अतिशय उत्साहात आणि दिमाखदारपणे संपन्न झाला. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वेशभूषा, भव्य मिरवणूक आणि उत्साहाने सहभागी झालेल्या बांधवांमुळे परिसरात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सागराशी पिढ्यान्पिढ्या जोडलेली नाळ, आगरी-कोळी बांधवांची जीवनशैली आणि त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन या उत्सवातून घडले. हा उत्सव म्हणजे केवळ आनंदाचा सोहळा नाही, तर आपल्या मातीशी, सागराशी आणि संस्कृतीशी असलेले अतूट नाते जपण्याचा अभिमानाचा क्षण होता. दिवाळे कोळीवाड्यात सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील पारंपरिक पद्धतीने “नारळ सोन्याचा, दिवाळे गावचा” हा विशेष उत्सव अतिशय दिमाखात पार पडला. सागराशी आणि आपल्या समृद्ध परंपरेशी असलेले हे अतूट नाते सदैव असेच जपले जावे, हीच सदिच्छा याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केली. कोळीगीतांचा जल्लोष आणि ग्रामस्थांच्या पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण समुद्रकिनारा उत्सवी रंगात न्हाऊन निघाला होता.या प्रसंगी दिवाळे गावातील ग्रामस्थ आणि आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील विविध कोळीवाड्यांना भेट देत आगरी-कोळी बांधवांच्या आनंदात सहभागी होत सणाचा उत्साह द्विगुणित केला. ‘दर्या सागर हाच आमचा खरा राजा!’ या श्रद्धेने दिवाळे गाव आणि सारसोळे जेट्टी येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित दर्याराजाच्या पूजन सोहळ्याला आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विशेष उपस्थिती लावली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेतला. दर्याराजाचे दर्शन घेत त्यांनी नवी मुंबईकरांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी कोळी बांधवांशी संवाद साधताना आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या, “आगरी-कोळी संस्कृती ही नवी मुंबईची खरी ओळख आणि आपला गौरव आहे. भूमीपुत्रांचे प्रश्न, कोळीवाड्यांचा विकास आणि मच्छीमार बांधवांचे हक्क यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. सण-उत्सव असो किंवा अडचणीचा काळ, माझ्या या कुटुंबाच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभी राहीन. दिवाळे आणि सारसोळे येथील मिरवणूक व पूजन सोहळ्यांना स्थानिक ग्रामस्थ, कोळी बांधव-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसराला आगरी-कोळी संस्कृतीच्या रंगाची उधळण झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आमदार मंदाताई म्हात्रे यांची उपस्थिती आणि आगरी-कोळी बांधवांशी साधलेला संवाद यामुळे भूमीपुत्रांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai