नवी मुंबईत 2.71 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 26
पात्र नागरिकांनी कार्ड काढून घेण्याचे आवाहन; महापालिकेच्या पाच रुग्णालयांसह 29 रुग्णालयांत सुविधा
नवी मुंबई : आर्थिकदृष्ट्या गरजू आणि पात्र कुटुंबांना मोठ्या वैद्यकीय खर्चापासून दिलासा देणाऱ्या ‘आयुष्मान भारतप्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 2 लाख 71 हजार 809 नागरिकांची आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली असून, अद्याप कार्ड न काढलेल्या पात्र नागरिकांनी तातडीने कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतात. गंभीर आजार, शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या विविध वैद्यकीय खर्चाचा यामध्ये समावेश आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. कार्ड तयार करण्यासाठी लाभार्थ्याकडे ऑनलाइन रेशन कार्ड असणे गरजेचे असून, ते अद्ययावत आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळोवेळी आयुष्मान कार्ड निर्मितीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. पात्र नागरिकांना आपल्या जवळच्या महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात, रेशनिंग दुकानात किंवा ई-सेवा सुविधा केंद्रात जाऊन कार्ड तयार करून घेता येणार आहे. आयुष्मान कार्डधारकांना या योजनेचा लाभ शासनाच्या अंगीकृत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये घेता येतो. नवी मुंबई महापालिकेची वाशी, ऐरोली आणि नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालये तसेच तुर्भे आणि बेलापूर येथील माता-बाल रुग्णालये, अशी एकूण पाच रुग्णालये या योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत. याशिवाय नवी मुंबईतील विविध खासगी रुग्णालयांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एमजीएम हॉस्पिटल, वाशी; डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरुळ; तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ; एमपीसीटी हॉस्पिटल, सानपाडा; इंडियन बर्न्स हॉस्पिटल, ऐरोली; क्रिटीकेअर आयसीयू अँड सुपरस्पेशालिटी सेंटर, ऐरोली; डॉ. आर. एन. पाटील सुरज हॉस्पिटल, सानपाडा; श्री हॉस्पिटल, वाशी; साई स्नेहदीप हॉस्पिटल, कोपरखैरणे; डिवाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घणसोली यांसह अन्य रुग्णालयांचा समावेश आहे. अंगीकृत रुग्णालयात उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी दाखल होताना लाभार्थ्याने रुग्णालयातील आरोग्यमित्र किंवा आरोग्यमैत्रीणीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यांच्यामार्फत योजनेअंतर्गत नोंदणी व आवश्यक पूर्वपरवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
- ऑनलाइन रेशन कार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन
नवी मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी संबंधित रेशनिंग कार्यालयातून ऑनलाइन रेशन कार्डची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, तसेच रेशन कार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असल्याची खात्री करावी. त्यानंतर आयुष्मान कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. आयुष्मान कार्ड आधीच तयार करून घेतल्यास गरजेच्या वेळी उपचाराची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. त्यामुळे पात्र नागरिकांनी ‘आजच आयुष्मान कार्ड काढा, उद्याची आरोग्याची चिंता टाळा’, असा संदेश देत महापालिकेने नागरिकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai