आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 24
मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करा; आयुष्मान कार्ड वितरणाला गती देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर आदर्श मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करून तिचे काटेकोर पालन करावे. रुग्णालय व्यवस्थापनातील कोणत्याही प्रक्रियेत त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक 7 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसह विविध आरोग्यविषयक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.महापालिका क्षेत्रातील 5 महापालिका रुग्णालये आणि 29 खासगी रुग्णालयांमध्ये या योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. मात्र, योजनांचा लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी वाशी किंवा नेरूळ रुग्णालयात विशेष मदत कक्ष सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच आयुष्मान कार्ड मिळण्यास विलंब होऊ नये यासाठी जिल्हास्तरावरून कार्ड उपलब्ध होण्याची प्रतीक्षा न करता महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्ड तयार करून त्याचे जलद वितरण करण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
क्षयरुग्णांची माहिती औषध विक्रेत्यांकडून संकलित करणार
- नमुंमपा क्षेत्रातील एकही क्षयरुग्ण उपचाराच्या कक्षेबाहेर राहू नये, यासाठी क्षयरोगाची औषधे खरेदी करणाऱ्या रुग्णांची माहिती सर्व औषध विक्रेत्यांकडून संकलित करण्याची कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी औषध विक्रेत्यांची बैठक आयोजित करून अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
- डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याच्या मोहिमेला वेग
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याच्या प्रतिबंधात्मक मोहिमांना अधिक गती देण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर घराभोवती पाणी साचू न देणे, अनावश्यक वस्तूंमध्ये पाणी साठू न देणे आदी उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. - गणेशोत्सवात आरोग्य सुविधांची माहिती फलकांद्वार
गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि विविध सार्वजनिक ठिकाणी भेट देतात. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले. - 30 वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला गती
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणांतर्गत असंसर्गजन्य आजार अभियानामध्ये 30 वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या तपासणीद्वारे मधुमेह, उच्च रक्तदाब, स्तन, गर्भाशय व मुखाचा कर्करोग, हृदयविकार तसेच स्ट्रोक यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे तपासणी प्रक्रियेत अचूकता आणि गुणवत्ता राखण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. - एकात्मिक आरोग्य धोरणाचा अभ्यास करण्याचे आवाहन
महापालिका सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरणाचा सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सखोल अभ्यास करावा आणि त्यातील तरतुदींविषयी आपले अभिप्राय द्यावेत, असेही आयुक्तांनी सूचित केले. रुग्णालयांमध्ये दुर्घटना टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी दक्षतेने काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्तरावरील कामकाजासाठी आदर्श कार्यप्रणाली निश्चित करून त्यानुसारच कार्यवाही करावी. रुग्णालय व्यवस्थापनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती काळजी घेत गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख आरोग्य सेवा देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai