महिनाभरात 60 आरोग्यविषयक जनजागृती शिबीरं
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 31
20,440 जणांनी दिली भेट ; 726 रक्तनमुने गोळा
नवी मुंबई ः महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत श्रावणी सोमवारचे औचित्य साधून विविध शिवमंदिरांमध्ये 60 आरोग्यविषयक जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले. श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी शिवमंदिरांमध्ये आयोजित शिबिरांमधून भाविकांमध्ये हिवताप, डेंग्यू आजारांबाबत प्रात्यक्षिकांसह जनजागृती करण्यात आली. या 60 शिबीरांच्या ठिकाणी एकूण 20,440 भाविकांनी भेट दिली असून यामध्ये 726 रक्तनमुने घेण्यात आले. हिवताप/डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना डासउत्पत्ती स्थानांची माहिती देण्यात आली व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग मिळविण्यात आला.
हिवताप / डेंग्यू चा प्रसार अनुक्रमे ॲनॉफिलीस व एडीस डासाची मादी घरातील व घराभोवताली साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते आणि यातूनच डासाचा जन्म होतो. सदर डास हिवाताप / डेंग्यू असलेल्या रुग्णाला चावल्यास त्याचे रक्त शोषून घेतो तेव्हा डासाच्या शरीरात जंतू किंवा विषाणू जातात. तोच डास जेव्हा निरोगी व्यक्तीला चावतो, तेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे डासामार्फत हिवताप / डेंग्यू आजाराचा प्रसार होतो. याची माहिती नागरिकांना देण्यात आली. या शिबिरांमध्ये ॲनॉफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने जसे की, पाणी साठवुन ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याचबरोबर पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या करून ठेवणे, इतस्तत: पडलेले भंगार साहित्य व टायर्स नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे नये व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरिकांना माहिती देऊन याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे आरोग्य विभागाचा नियमित आढावा घेत असून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा क्षेत्रातील बाधकाम साईट्सवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. नवी मुंबईतील सर्व बांधकाम व्यावसायिकांना आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले असून त्यामध्ये सर्व बांधकाम व्यावसायिकांनी आपली बांधकाम साईट व मजूर वस्ती या ठिकाणी स्वच्छता राखणे, मजूरांच्या याद्या अद्ययावत करणे, यासाठी नोडल ऑफीसर नियुक्त करणे, नियमित पेस्ट कंट्रोल करणे इ. बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याचे सूचित केले आहे. या बाबींचे पालन होत असल्याची खातरजमा नमुंमपा आरोग्य विभागाची क्षेत्रीय पथके लक्ष ठेवून करीत आहेत. यामुळे बांधकाम स्थळांवरील डासउत्त्पत्ती स्थानांवर नियंत्रण मिळणे अधिक प्रभावी होत आहे.
नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहेच, त्यासोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai