आयुक्तांच्या प्रकल्पांना सत्ताधाऱ्यांचा ‘ब्रेक’
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 11, 2026
- 20
वाशीचे क्रीडा संकुल, बेलापूरचा सेवा रस्ता स्थायी समितीत बहुमताने नामंजूर
वाशीऐवजी ऐरोलीत क्रीडा संकुलाचा आग्रह; अपोलो सिग्नलवर उड्डाणपुलाच्या पर्यायावर भर
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून प्रस्तावित करण्यात आलेला बेलापूरमधील समांतर सेवा रस्ता आणि वाशी सेक्टर 10 येथील बहुचर्चित क्रीडा संकुल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सत्ताधारी भाजपने बुधवारी स्थायी समितीच्या सभेत बहुमताच्या जोरावर नामंजुरी दिली. प्रशासकीय राजवटीत महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी पुढाकार घेऊन या दोन्ही प्रकल्पांची आखणी केली होती. मात्र, दोन्ही प्रस्तावांवर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांना तूर्तास ब्रेक लागला आहे.
दोन वर्षांपूर्वीचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी वाशीतील क्रीडा संकुलाची संकल्पना प्रथम मांडली होती. वाशीपुरते मर्यादित न राहता मध्यवर्ती नवी मुंबईतील नागरिकांना विविध खेळांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. गेल्या दीड-दोन वर्षांपासून शहर अभियंता विभागाकडून त्यावर काम सुरू होते. वाशी आणि बेलापूर परिसरात खासगी क्रीडा सुविधा उपलब्ध असल्या तरी महापालिकेचे दर्जेदार इनडोअर क्रीडा संकुल नसल्याने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, परिमंडळ-1 मध्ये आधीच क्रीडा सुविधा उपलब्ध असून परिमंडळ-2 मधील नागरिकांना प्रथम सुविधा देण्यात याव्यात, तसेच वाशीतील प्रस्तावासाठी होणारा खर्च अधिक असल्याचा मुद्दा सत्ताधारी सदस्यांनी उपस्थित केला. क्रीडा संकुल ऐरोली विधानसभा मतदारसंघात उभारण्याची मागणी करत वाशीतील प्रस्तावच फेटाळण्यात आला.
क्रीडा संकुलानंतर महापालिका मुख्यालय ते एअर इंडिया कॉलनीदरम्यान प्रस्तावित समांतर सेवा रस्त्याचा विषयही स्थायी समितीत नामंजूर करण्यात आला. या रस्त्याची मूळ अंदाजित किंमत सुमारे 54 कोटी रुपये असून जीएसटीसह स्वीकृत निविदेची किंमत 61 कोटी 55 लाख 75 हजार रुपये आहे. मात्र, हा रस्ता केवळ एअर इंडिया कॉलनीपर्यंत मर्यादित राहणार असल्याने त्याचा फायदा ठरावीक परिसरापुरताच होईल आणि उरण फाट्याजवळील अवजड वाहनांची कोंडी कायम राहण्याची शक्यता असल्याचा आक्षेप सत्ताधारी सदस्यांनी घेतला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ सदस्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याने हा प्रस्तावही बारगळला.
- सेवा रस्त्याऐवजी अपोलो सिग्नलवर उड्डाणपूलचा पर्याय
सभागृह नेते सागर नाईक यांनी समांतर सेवा रस्त्याऐवजी सीबीडीतील अपोलो रुग्णालयाच्या सिग्नलवर उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय मांडला. या माध्यमातून नेरूळकडे जाणारी वाहतूक, उरण फाट्याकडे जाणारी वाहने आणि जेएनपीटीच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक अधिक सुरळीत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. महापालिकेच्या निधीचा व्यापक आणि दीर्घकालीन उपयोग होण्यासाठी या पर्यायाचा तांत्रिक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी सांगितले. शिवसेना (एकनाथ शिंदे) नगरसेवक सरोज पाटील यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला. एअर इंडिया कॉलनीसह इन्कम टॅक्स कॉलनी, एकता विहार, विविध सोसायट्या आणि अपोलो रुग्णालयाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित मेट्रो मार्गरेषा आणि स्थानकाचा विचार करूनच उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाचा आराखडा निश्चित करावा, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. भाजप नगरसेवक सुधाकर सोनवणे यांनीही पुढील 20 ते 25 वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची मागणी केली. - ‘आयुक्तांना विरोध नाही’, सभापतींची सारवासारव
दरम्यान, स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी या निर्णयामागे आयुक्तांना विरोध करण्याचा अथवा सत्ताधारी म्हणून प्रशासनाचे प्रस्ताव रोखण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. परिमंडळ-1 मध्ये क्रीडा सुविधा उपलब्ध असल्याने परिमंडळ-2 मधील नागरिकांनाही समान सुविधा मिळाव्यात, ही सदस्यांची आणि नागरिकांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.प रिमंडळ-2 मध्ये क्रीडा सुविधांना प्रथम प्राधान्य देऊन त्यानंतर वाशीतील प्रस्तावाचा विचार करता येईल. भविष्यात निधी उपलब्ध झाल्यास हा विषय पुन्हा सभागृहासमोर आणता येईल, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. समांतर रस्त्याबाबतही प्रस्तावाला कायमस्वरूपी विरोध नसून भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुधारित प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai