बांधकाम क्षेत्रातील वायू प्रदूषणावर पालिकेची कडक पावले
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 23
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्टॉप वर्क आणि सीलिंगची कारवाई होणार
नवी मुंबई ः आगामी हिवाळी हंगामात हवेची गुणवत्ता ढासळू नये आणि बांधकामांठिकाणी होणारे वायू प्रदूषण रोखले जावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, सर्व्हेअर्स आणि संबंधित भागधारकांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत उच्च न्यायालयाच्या व उच्च-स्तरीय समितीच्या निर्देशांनुसार, शहरातील सर्व बांधकाम ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले की, वाढते प्रदूषण आणि ढासळती हवेची गुणवत्ता ही केवळ एक कायदेशीर बाब नसून नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेली गंभीर समस्या आहे. हिवाळ्यात प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसानाचा त्रास असलेल्या रुग्णांना प्रदूषणाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी व्यवसायासोबतच आपली सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. आपणही येथील नागरिक आहोत व हीच हवा श्वसनासाठी वापरतो याचे गांभीर्य बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बांधकाम स्थळावर बांधकामासाठी तसेच धूळ जमिनीवर बसविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. बिल्डर्सनी यासाठी बिगर-पिण्याचे किंवा प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले आहे. याचे उल्लंघन झाल्यास कोणतीही सूट न देता तात्काळ काम थांबवण्याचे आणि जागा सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सर्व बांधकामांठिकाणी 30 फूट उंचीचे बॅरिकेडिंग लावणे, इमारतीला वरून खालीपर्यंत पूर्णपणे झाकणारे ग्रीन-नेट (हिरवी जाळी) लावणे, वाहनांच्या चाकांमुळे रस्त्यावर धूळ पसरू नये म्हणून बाहेर पडण्याच्या मार्गावर टायर-वॉशिंग सुविधा उभारणे आणि नियमित पाणी फवारणी करणे अनिवार्य आहे. प्रत्येक बांधकाम क्षेत्रावर हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स बसविणे आणि नागरिकांना हवेची सद्यस्थिती कळावी म्हणून एक्युआय डिस्प्ले फलक लावणे बंधनकारक आहे. यापुढे बीपीएमएस प्रणालीद्वारे आवश्यक त्या सर्व प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची पूर्तता केल्याचे दस्तऐवज आणि बिल्डरचे व वास्तुविशारद यांचे हमीपत्र घेतल्याशिवाय बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
नगररचना विभाग आणि विभाग कार्यालयांचे अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त पाहणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. ज्या बांधकाम ठिकाणी नियमांचे उल्लंघन किंवा अपूर्णता आढळेल, तिथे तात्काळ काम थांबवणे, जागा सील करणे आणि मोठा आर्थिक दंड ठोकणे अशी कडक कारवाई करण्यात येणार आहे. या नियमांची माहिती सर्व बांधकाम विकासक आणि वास्तुविशारद यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रेडाई आणि इतर बिल्डर असोसिएशनच्या समन्वयाने लवकरच एक विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे सोमनाथ केकाण यांनी सांगितले. नवी मुंबईतील पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिका कटिबद्ध असून, त्यासाठी संबंधित सर्व घटकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai