चिमुरडीची अत्याचार करुन हत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2026
- 26
नवी मुंबई : घराजवळ खेळत असताना बेपत्ता झालेल्या नऊ वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिराजवळील टेकडीवर आढळून आला. मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे 30 वर्षीय आरोपीला सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी ही मुलगी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला; मात्र ती न सापडल्याने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलीचा शोध सुरू केला. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली. स्थानिक नागरिकांकडे चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना मुलीच्या परिचयातील आणि त्याच परिसरात राहणारा 30 वर्षीय व्यक्ती तिला खाऊचे आमिष दाखवून सोबत घेऊन जात असल्याचे चित्रणात दिसून आले. संबंधित व्यक्ती मुलीला रिक्षातून घेऊन गेल्याचेही तपासात समोर आले. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने मुलीला पावणे एमआयडीसी परिसरातील जंगलात, बावखळेश्वर मंदिराजवळील टेकडीवर नेल्याची माहिती दिली. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित परिसरात शोध घेतला असता मुलीचा मृतदेह आढळून आला.
‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकात वरिष्ठ दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात येणार आहे. गुन्ह्याशी संबंधित सर्व पुरावे गोळा करणे, घटनाक्रमाची पडताळणी करणे आणि आरोपीविरुद्ध न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्याच्या दृष्टीने तपास केला जाणार आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास सुरू आहे. गुन्ह्याशी संबंधित अन्य बाबींचीही चौकशी केली जाणार आहे. चिमुरडीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तपास पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक पुरावे न्यायालयात सादर करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai