‘पर्यटन तहसील’ नावाचे बनावट कार्यालय
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 11
धार्मिक तेढ निर्माण करणारी पत्रे पाठवणाऱ्या तरुणाला अटक
नवी मुंबई : शासकीय कार्यालयाचे नाव, अधिकृत लोगो आणि बनावट शिक्क्याचा वापर करून अस्तित्वात नसलेल्या ‘पर्यटन तहसील कार्यालय’च्या नावाने प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट कार्यालयाचा सह महसूल अधिकारी असल्याचे भासवून ठाणे जिल्हाधिकारी आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना प्रक्षोभक आशयाची पत्रे पाठविणाऱ्या सुयश संजय शिर्के (30) याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ला आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असलेला मजकूर या पत्रांमध्ये असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाला ‘किरण कुमार’ या नावाने एक संशयास्पद पत्र प्राप्त झाले होते. या पत्रावर ‘सह महसूल अधिकारी, पर्यटन तहसील कार्यालय’ असा उल्लेख होता. मात्र, शासनाच्या अभिलेखात अशा नावाचे कोणतेही कार्यालय अस्तित्वात नसल्याचे प्राथमिक पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळे पत्र पाठविणाऱ्याची ओळख आणि त्यामागील उद्देश शोधण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने वाशी पोलिसांना दिले होते. या पत्रात आगामी रमजान ईद तसेच मार्च ते मे या कालावधीत कल्याणमधील दुर्गाडी किल्ला आणि परिसरात मुस्लिम समाजाला नमाज पठण करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. याशिवाय कल्याण बंदर आणि दुर्गाडी किल्ला परिसरातील निकाल व विजयोत्सवाच्या नावाखाली वाशी सेक्टर 17 मधील एका खासगी इमारतीत पत्रकार परिषद घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. शासकीय पदाचा आभास निर्माण करून पाठविण्यात आलेल्या या पत्रांमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार संदीप ढवळे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. पत्र पाठविण्यासाठी वापरलेल्या कुरिअर कंपनीच्या नोंदी, माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. वाशी सेक्टर 17 मधील एका छायांकित प्रत केंद्रातून पेनड्राइव्हच्या आधारे पत्रांची छपाई करून ती कुरिअर करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी माग काढला. तांत्रिक तपासातून सुयश शिर्के याची ओळख पटली. मुरबाडमधील नाणेघाट परिसराचा पत्ता आणि जीमेल खात्याचा वापर करून त्याने बनावट लेटरहेड तयार केले होते. त्यावर शासकीय कार्यालयाचा आभास निर्माण करणारे नाव, लोगो आणि शिक्क्याचा वापर करण्यात आला होता. याच बनावट कार्यालयाच्या नावाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रे पाठविण्यात आली.पोलिसांनी शिर्केविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 336(2) आणि 340(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान त्याने ठाणे जिल्हाधिकारी आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना प्रक्षोभक आशयाची पत्रे पाठविल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai